'पीएमपी' २५ टक्के ‘खिळखिळी’!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानला जाणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आता जीर्णावस्थेत पोहोचली आहे. सध्या त्यांच्या ताफ्यात ३२७ कालबाह्य बस असून, फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्यात आणखी २६६ बसची भर पडणार आहे. याचाच अर्थ, ५९३ बस या ताफ्यातून काढून टाकण्याच्या अवस्थेतील असतील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 2 Jun 2023
  • 09:05 am
'पीएमपी' २५ टक्के ‘खिळखिळी’!

'पीएमपी' २५ टक्के ‘खिळखिळी’!

फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकूण २०७९ पैकी ५९३ बस होणार कालबाह्य; प्रशासन मात्र ढिम्मच

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानला जाणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आता जीर्णावस्थेत पोहोचली आहे. सध्या त्यांच्या ताफ्यात ३२७ कालबाह्य बस असून, फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्यात आणखी २६६ बसची भर पडणार आहे. याचाच अर्थ, ५९३ बस या ताफ्यातून काढून टाकण्याच्या अवस्थेतील असतील. अशा खिळखिळ्या बस गाड्यांवर दोन शहरांची मुख्य सार्वजनिक वाहतूक चालवण्याचे आव्हान पीएमपी प्रशासनाच्या डोक्यावर असणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबरच लगतच्या ग्रामीण भागातही पीएमपीची बस सेवा दिली जाते. सुमारे ७७ लाख लोकसंख्येला शहरांतर्गत वाहतूक सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे काम पीएमपी करते. दररोज सुमारे बारा लाख प्रवासी या सेवेचा उपयोग करतात. शहरात सुमारे ४४ लाख वाहने आहेत. त्यातील सुमारे ३१.७४ लाख दुचाकी, ७.७१ लाख चारचाकी आहेत, तसेच रिक्षांची संख्या ९० हजारावर आहे. वैयक्तिक आणि खासगी प्रवासी वाहनांच्या वाढलेल्या संख्येनंतरही पीएमपीची प्रवासी संख्या लक्षणीय आहे.    

मेट्रो आणि रेल्वेला पुरक अशी पीएमपी सेवा देण्याबाबत अनेकदा चर्चा करण्यात येते. मात्र, पीएमपीच्या वाहनांची सध्याची स्थिती पाहिल्यास वाहने अत्यंत जीर्ण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २०७९ बस आहेत. त्यातील ९८१ बस या पीएमपीच्या मालकीच्या असून, १ हजार ९८ बस खासगी ठेकेदारांच्या आहेत. प्रवासी वाहने १० वर्षांनी सेवेतून काढून घेणे (स्क्रॅप करणे) आवश्यक असते. या निकषानुसार सध्या ३२७ बस कालबाह्य झाल्या आहेत. तर, २६६ बस फेब्रुवारी २०२४ मध्ये निवृत्त होतील. म्हणजे सध्या असलेल्या एकूण बसपैकी २९ टक्के बस या निवृत्तीला आलेल्या असतील. अशा खिळखिळ्या झालेल्या बसवर प्रवासीसेवा द्यावी लागेल. जितक्या बस अधिक जीर्ण तितक्या बस ब्रेकडाऊन (मध्येच बस बंद पडण्याचे) होण्याचे प्रमाणही अधिक असणार आहे. सध्या दररोज सरासरी ४० बस मध्येच बंद पडतात. त्याचा त्रास प्रवाशांना बसतो. शिवाय बस बंद पडल्याने वाहतुकीला होणारा अडथळा, बस दुरुस्तीसाठी ओढून नेण्याची कसरत हा वेगळा त्रास सहन करावा लागतो. याचबरोबर देखभाल दुरूस्ती आणि इंधन खर्चात होणारी वाढ याचे गणित पाहिल्यास कालबाह्य झालेल्या वाहनांवर अधिक खर्च होतो. त्याचा आर्थिक ताण पीएमपीवर पडत आहे.  

पीएमपीचे मुख्य अभियंता रमेश चव्हाण म्हणाले, 'नियमानुसार प्रवासी बस १० वर्षांनी निवृत्त करायला हव्यात. अन्यथा अशा बसचा देखभाल खर्च वाढतो. प्रतिलिटर इंधनामागे बस कमी अंतर कापत असल्याने इंधन खर्चातही दहा टक्के वाढ होते. इंजिनाचे काम वारंवार करावे लागते.'

पीएमीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले, 'या पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ४५८ बस दाखल झाल्या आहेत. तर, ऑगस्ट अखेरीस १२ मीटरच्या १९२ ई-बस ताफ्यात दाखल होतील. लोकसंख्येच्या निकषानुसार पीएमपीकडे किमान ३८५० बस हव्यात. सध्या एकूण बसची संख्या २०७९ इतकी आहे.'

पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले, 'पीएमपीएमएलने टप्प्या-टप्प्याने कालबाह्य झालेल्या बस ताफ्यातून काढून टाकणे आवश्यक होते. एकदम शेकड्याने बस ताफ्यातून काढणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. मग खासगी कंत्राटदारांशिवाय पर्याय उरत नाही. जाणीवपूर्वक खरेदी लांबवत खासगी ठेकेदारांसाठी पीएमपीची दारे उघडी केली जात नाही ना? अशी शंका उपस्थित होते. कालबाह्य बस चालवल्याने 'ब्रेकडाऊन' वाढते. परिणामी, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. दरवर्षी नियमितपणे काही बस निवृत्त केल्यास सातत्याने चांगल्या बस सेवेत ठेवणे शक्य होईल. '  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest