Taljai Forest : तळजाईच्या जंगलात डुक्कर पैदास केंद्र

वन्यजीव संपदा असलेल्या शहरातील प्रमुख टेकड्यांमध्ये तळजाईच्या पाचगाव पर्वती टेकडीचा समावेश होतो. सुमारे एक हजार एकरवर पसरलेल्या टेकडीवर मोर आणि ससे पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून इथे डुकरांची अनधिकृत पैदास केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुक्त संचार करणारी डुकरे दिसूनही वन विभागाचे अधिकारी मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 22 May 2023
  • 10:33 am
तळजाईच्या जंगलात डुक्कर पैदास केंद्र

तळजाईच्या जंगलात डुक्कर पैदास केंद्र

वराह पालन करणाऱ्यांची कामगिरी, पिलावळीने मुक्तसंचार करणाऱ्या डुकरांचे घ्यावे लागते सकाळी सकाळी दर्शन

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

वन्यजीव संपदा असलेल्या शहरातील प्रमुख टेकड्यांमध्ये तळजाईच्या पाचगाव पर्वती टेकडीचा समावेश होतो. सुमारे एक हजार एकरवर पसरलेल्या टेकडीवर मोर आणि ससे पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून इथे डुकरांची अनधिकृत पैदास केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुक्त संचार करणारी डुकरे दिसूनही वन विभागाचे अधिकारी मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसतात.

शहराच्या मध्यवर्ती भागात तळजाईची टेकडी वसलेली आहे. सिंहगड रस्ता, वडगाव, धनकवडी, पर्वती आणि सहकारनगरचा शेजार या टेकडीला आहे. शहरातील विविध भागातून दररोज पाच ते सहा हजार नागरिक इथे नियमित फिरायला येतात. शनिवारी आणि रविवारी ही संख्या आठ ते दहा हजारांवर जाते. मोरांचा केका कायम कानी पडत असतो. कधी कधी मधूनच या झाडावरून त्या झाडावर उडत जाणारा मोरही दिसतो. क्वचित धामण जातीचा सापही समोरून जातो.

गेल्या काही महिन्यांपासून इथे डुकरांची पैदास केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोरांच्या दर्शनाबरोबरच डुकरांची पिलावळ आणि मादी डुक्कर नजरेला पडते. मात्र, अशा या ‘सुंदर’ दर्शनाकडे वन विभागाचे लक्ष नसल्याचे दिसते. इतकेच काय तर तळजाई वनविहाराला लागून असलेल्या काही रहिवासी इमारतीतील कचराही जंगलामध्ये टाकला जात आहे. तळजाई वनविहाराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून डावीकडे गेल्यावर शंभर मीटरवर अक्षरशः कचराकोंडी झाली आहे. फिरायला येणाऱ्या नागरिकांकडूनदेखील वेफर्सची पाकिटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या दिसतात. त्यामुळे वनविहारात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. त्यातच सुरू असलेली डुकरांची पैदास. याला वेळीच अटकाव घातला नाही तर तळजाईची रया जाईल.

तळजाई येथे फिरायला येणारे नागरिक सचिन शिंगवी म्हणाले, वराह पालन करणाऱ्या काही टोळ्यांनी ही डुकरे इथे सोडली आहेत. तळजाईचा वापर खासगी पैदास केंद्रासारखा केला जात आहे. इतक्या मोठ्या वनविहारासाठी अवघे दोन सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच, वनविहारात कचरा टाकणाऱ्या लगतच्या रहिवासी इमारतींच्या मालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच फिरायला येणाऱ्यांना प्लास्टिकच्या वस्तू नेण्यास मज्जाव करायला हवा.

इथे नियमित फिरायला येणारे फिटनेस ट्रेनर संजय शिंदे (नाव बदलले आहे) म्हणाले, यापूर्वी एकदा एका नगरसेवकाने प्रशासनाला सांगून डुकरे पकडून नेली होती. मात्र, काही विशिष्ट जमातीतील लोकांकडून या डुकरांची पैदास केली जाते. त्यांनी ही डुकरे वनविहारात सोडली आहेत. या नगरसेवकाने कारवाई केल्यानंतर संबंधित लोकांनी त्यांच्या कार्यालयात ठाण मांडले होते. त्यानंतर संबंधित नगरसेवकाने आपले लक्ष काढून घेतले. आता पुन्हा वनविहारात डुकरे सोडल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यातही काही जणांनी वनविहारात डुकरे सोडली होती. त्यावेळी डुकरे पकडली होती. महापालिकेशी संपर्क साधून पुन्हा डुकरे पकडली जातील. यात सहभागी टोळीचा देखील माग काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, वनविहारात कचरा टाकणाऱ्यांना लवकरच नोटिसा काढल्या जातील.

- प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा

म्हणून या भागाला म्हणतात पाचगाव पर्वती...

आंबिल ओढा आणि सिंहगड रस्त्याच्या परिसराला या टेकडीने वेगळे केले आहे. पर्वती, धनकवडी, आंबेगाव बुद्रुक, वडगाव बुद्रुक आणि हिंगणे खुर्द या पाच गावांच्या सीमा या टेकडीला भिडतात म्हणून ती पाच गावांची टेकडी झाली. त्यामुळे या भागाला पाचगाव पर्वती म्हणूनही संबोधले जाते. तळजाई देवीमुळे ही टेकडी तळजाई म्हणून प्रसिद्ध आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest