फोटोची कमाल की दोन मेट्रो एकाच ट्रॅकवर?
छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात एकाच ट्रॅकवर चक्क दोन मेट्रो आल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात पुणे मेट्रो प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे शुक्रवारी स्पष्टीकरण दिल्याने अनेक प्रवाशांचा जीव भांड्यात पडला आहे.
व्हायरल व्हीडीओमध्ये, ट्रॅकवर एक मेट्रो उभी असताना दुसरी मेट्रो समोर आल्याचे दिसत असून स्थानिक कार्यकर्ते नीलेश निकम यांनी या घटनेचा व्हीडीओ शूट केला आहे. वेगात आलेल्या मेट्रो चालकाने ब्रेक लावल्याने अनर्थ टळल्याचा दावा या व्हीडीओत करण्यात आला आहे. मात्र पुणे मेट्रोने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ही केवळ विशिष्ट अँगलमधून घेतलेल्या फोटोची कमाल असल्याचे म्हटले आहे.
एकाच ट्रॅकवरील दोन मेट्रोचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोकडून तातडीने खुलासा करण्यात आलेला आहे. याबाबत मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले की, मेट्रोचा व्हीडीओ खालून घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही मेट्रो एकाच मार्गावर आल्याचे आपल्याला दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र दोन्ही मेट्रो वेगवेगळ्या मार्गावर आहेत. ते पुढे असे म्हणाले की, हॉर्न वाजवणाऱ्या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे. दोन्ही मेट्रो मुख्य मार्गावर नाहीत. त्या डेपोमध्ये ये-जा करण्याच्या मार्गावर आहेत. यामधील एक मेट्रो डेपोमध्ये जात आहे, तर दुसरी डेपोमधून मुख्य मार्गावर येत आहे.
मागच्याच आठवड्यात मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच ट्रॅकवर दोन लोकल आलेल्या होत्या. त्यातच एका ट्रॅकवर दोन मेट्रो आल्याचा पुण्यातील व्हीडीओ व्हायरल झालेला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने पुण्याची मेट्रो नेहमी चर्चेत असते. या व्हीडीओमुळे पुन्हा पुणे मेट्रो चर्चेत आलेली आहे. गेल्या ३१ जुलैला मुंबईतील सीएसएमटीच्या फलाट क्रमांक ४ वरून ठाण्याकडे जाणारी लोकल सुटली. याचवेळी कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या दिशेने येत होती. कल्याण-सीएसएमटी मोटरमनने लाल सिग्नल ओलांडला होता. अनवधानाने प्लॅटफॉर्म क्रमांक ४ साठी असलेल्या ट्रॅकवर ती लोकल गेली. कल्याण-सीएसएमटी लोकलच्या मोटरमनला कठीण परिस्थितीची जाणीव झाली. त्याने तत्काळ ट्रेन थांबवली. दोन्ही मोटरमननी आपत्कालीन ब्रेकिंग यंत्रणा वापरली, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.