पेट्रोलपंपावर आता 'गुलाबी' हवा
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर केल्यानंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटेचा वापर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर नागरिकांनी त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा पेट्रोलवर खर्च करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा दुप्पट प्रमाणात दोन हजारांच्या नोटा जमा होत असल्याने पेट्रोल पंपावर सुट्या पैशांची चणचण जाणवत आहे.
आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. आरबीआयने २३ मे पासून देशातील सर्व बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेता येणार आहेत. तसेच, या नोटांनी खरेदीदेखील करता येणार आहे. नियमानुसार दोन लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम खात्यात जमा झाल्यास त्याची माहिती फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला दिली जाणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वापर अचानक वाढला आहे.
विविध वस्तू आणि सेवा घेण्यासाठी या नोटांचा वापर सढळ हाताने केला जात आहे. आता पेट्रोल भरण्यासाठीही दोन हजाराची गुलाबी नोट काढली जात आहे. साधारणतः कार आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांत टाकी फुल्ल करण्यासाठी चलनातील मोठ्या नोटेचा वापर करतात. मात्र, आता दुचाकीचालकही आपल्याकडील दोन हजाराची नोट पेट्रोल भरण्यासाठी काढत आहे. त्यातून केवळ दोनशे ते पाचशे रुपयांचे पेट्रोल भरत असल्याने पेट्रोल पंपचालकांना सुट्ट्या पैशांची टंचाई जाणवत आहे.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, '२०१६ साली झालेल्या नोटबंदीनंतर पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यावेळी नागरिक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पेट्रोल भरण्यासाठी वापरत होते. त्या प्रमाणात गोंधळाची स्थिती सध्या नाही. मात्र, आरबीआयने दोन हजाराच्या नोटेबाबत केलेल्या घोषणेनंतर इंधनाच्या खरेदीसाठी दोन हजाराच्या नोटेचा वापर वाढला आहे. या निर्णयापूर्वी दररोज १० ते २० या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा जमा होत होत्या. आता ही संख्या ४० ते ५० च्या घरात पोहोचली आहे.'
पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले, 'नेहमीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्क्यांनी दोन हजाराच्या नोटेचा वापर वाढला आहे. अचानक मोठ्या प्रमाणावर दोन हजाराच्या नोटेचा वापर वाढल्याने पंपचालकांना सुट्या पैशांची चणचण जाणवत आहे.'
सप्टेंबरअखेरीस जमा होणाऱ्या नोटांचे काय ?
आरबीआयने ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या नोटा बँकेतून बदलून मिळतील असे सांगितले आहे. मात्र, ३० सप्टेंबरला शनिवार येत असून, १ ऑक्टोबरला रविवार येतो. त्यामुळे आरबीआयने दोन हजाराची नोट स्वीकारण्यासाठी जाहीर केलेल्या अखेरच्या दिवशी जमा झालेल्या नोटा बँकेत भरताना व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यावर आरबीआयने आताच स्पष्टीकरण द्यायला हवे. अन्यथा गैरसमजातून गोंधळ वाढेल. याबाबत गोंधळाची स्थिती उद्भवू नये यासाठी आरबीआयने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी केली आहे.