पाणी साचणाऱे रस्ते, नाले, ओढ्यावर राहणार लक्ष, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न
सीविक मिरर ब्यूरो
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून वारंवार वाहतूक कोंडी होणारे नाले, चौक आणि रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मेट्रो, रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांमुळे पाणी साचू नये. त्याचबरोबर पावसामुळे वाहतूककोंडी होऊ नये याची याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.
शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना संबंधित यंत्रणांना गुरुवारी (दि.१) देण्यात आली. मान्सूनपूर्व तयारीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात गुरुवारी विशेष बैठक आयोजित केली होती. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह महामेट्रो, टाटा मेट्रो, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पीएमपीएमएलचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गेली काही वर्षे शहरात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कमालीची संथ होते. त्या पार्श्वभूमीवर पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोणत्या उपयाययोजना कराव्यात यावर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. नेहमी पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरू असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरू असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे अशा विविध बाबींवर यात विचारविनिमय करण्यात आला. गटारे, नाले सफाईची कामे वेगाने पूर्ण करावीत, गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत अशा सूचना देण्यात आल्या. सफाईत निघालेला राडारोडा तात्काळ उचलण्यासही बजावण्यात आले.
पावसाळी (स्टॉर्म वॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा कामांमुळे रस्त्यात पडलेला राडारोडाही तातडीने काढून घेण्याची सूचना संबंधित विभागांना देण्यात आली. मेट्रोने त्यांची कामे जलद गतीने करावीत. त्यांच्या कामामुळे खोळंबा होणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाने यापूर्वीच मेट्रोला नदीपात्रातील राडारोडा काढून घेण्याबाबत पत्र दिले आहे. मेट्रोची अनेक कामे नदीपात्रात सुरू आहेत. कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य, राडारोडा नदीपात्रातच पडलेला आहे. हा राडारोडा तसाच राहिल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरू शकतो. नदीपात्र प्रवाही राहावे यासाठी मेट्रो प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज असल्याचे जलसंपदा विभागाने मेट्रोला कळवले आहे.
पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे महापालिका, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगाव नाला, जांभुळवाडी नाला यांसारखे नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात पीएमपी बस नादुरूस्त होऊ नये यासाठी पीएमपीने काळजी घ्यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत.
अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय राहावा याकरिता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष उभारावा. तसेच प्रत्येक विभागात जलद संपर्क व्हावा यासाठी संदेशवहन प्रणाली उभारण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सीविक मिररशी बोलताना म्हणाले, पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महापालिका स्तरावरही चार-पाच बैठका झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महापालिका, मेट्रो, पीएमआरडीए, पोलीस अशा विभागांत समन्वय राखणे गरजेचे आहे. शिवाजीनगर-हिंजवडी येथील मेट्रोचे काम सुरू असेल तर संबंधित यंत्रणेने ते काम पाऊस सुरू होण्यापूर्वी केले पाहिजे. अतिक्रमण विभागाने अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली पाहिजेत. जांभूळवाडी नाला परिसर, आंबिल ओढा नाला परिसर, जंगली महाराज रस्त्यासह वारंवार तुंबणाऱ्या विविध ठिकाणांवर अधिक काळजी घेण्याचे आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत.