वीस वर्षांच्या झाडाची 'पवार पब्लिक स्कूल'ने केली कत्तल
लक्ष्मण मोरे
निसर्गनियमानुसार विशिष्ट काळात बिज प्रसारासाठी झाडावर फुलोरा तयार होतो. काही झाडांवर कापूससदृश्य कण तयार होतात आणि ते हवेच्या माध्यमातून इतरत्र पसरतात. ही प्रक्रिया काही दिवसासांठी असते. मात्र, ही सामान्य बाबही गावी नसणाऱ्या नांदेड सिटीतील (Nanded City) 'पवार पब्लिक स्कूल'ने (Pawar Public School)एक वीस वर्षांचे पूर्ण वाढ झालेले झाड विनापरवानगी तोडून टाकले. कापूससदृश्य कणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी, आसपासच्या सोसायटीतील नागरिकांना केल्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही दिवसांच्या त्रासासाठी पूर्ण वाढीचे एकमेव झाड तोडणे अनाकलनीय आहे. तसेच पर्यावरणाचा पुरस्कार करण्याच्या हेतूला हरताळ फासणारे आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध शैक्षणिक संस्था, रहिवासी संकुलांमधील झाडे पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) परवानगी शिवाय तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार नांदेड सिटी येथील 'पवार पब्लिक स्कूल'मध्ये घडला. शाळेच्या आवारातील झाड गुपचूप तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी 'पीएमआरडीए'कडे तक्रार दिली होती. सुरुवातीला याबाबत 'पीएमआरडीए' ने बोटचेपी भूमिका घेतली होती. 'पीएमआरडीए' कारवाई करीत नसल्याबाबत नागरिकांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर 'पीएमआरडीए'ने पवार पब्लिक स्कूलला नोटीस बजावली आहे. दरम्यान, या पत्राला आवश्यक ते उत्तर देणार असल्याचे शाळा प्रशासनाने 'सिविक मिरर'शी बोलताना सांगितले.
नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलमध्ये असलेले २० वर्षे जुने झाड तोडण्यात आले आहे. पूर्ण वाढ झालेले आणि हिरवेगार झाड विनापरवाना कापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नांदेड सिटीमधील रहिवासी स्मित पाठक यांनी पवार पब्लिक स्कूलमध्ये झाडे तोडली जात असल्याचे प्रकरण समोर आणले होते. पाठक हे मनसे पर्यावरण सेनेचे शहर सचिवही आहेत. त्यांनी झाड तोडले जातानाचे व्हीडीओ चित्रीकरणही केले होते. झाड तोडल्यानंतर ती जागा सपाट करण्यात आली. वृक्षप्रेमी स्मित पाठक यांनी याबाबत 'पीएमआरडीए'च्या सोशल मिडीया अकाऊंट व ईमेलवर यासंदर्भात पोस्ट करून कारवाईची मागणी केली होती. 'पीएमआरडीए'कडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबत ईमेल करून तक्रार दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना याबाबत ईमेल मिळाल्याचा प्रतिसाद दिला. दरम्यान, थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल झाल्याने 'पीएमआरडीए'ने जुजबी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात सुरुवातीला माहिती घेण्यासाठी 'पीएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असला त्यांनी बोलण्यास नकार दिला. एका अधिकाऱ्याने तर, 'मला या विषयात कृपया बोलायला लावू नका. मी छोटा अधिकारी आहे' असे सांगत बोलण्यास नकार दिला.
यासंदर्भात स्मित पाठक यांनी 'सिविक मिरर'शी बोलताना सांगितले की, पवार पब्लिक स्कूलमध्ये झाड तोडण्यात येत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर 'पीएमआरडीए'कडे तक्रार करण्यात आली. पीएमआरडीच्या अधिकारी शिवानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली. तसेच, पीएमआरडीएचे आणखी एक अधिकारी विवेक डुबेवार यांनी पूर्ण वाढ झालेले झाड तोडण्यात आल्याचे कबूल केले. या झाडाचा घेर देखील मोठा होता. या विषयी तक्रार करून देखील पीएमआरडीकडून कारवाईला विलंब लावण्यात येत आहे. याविषयी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याचे पाठक म्हणाले. वृक्ष तोडीचा हा विषय 'दाबला' जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
शाळेची कबुली
दरम्यान, याविषयी शाळेची आवारातील एक झाड आमच्याकडून तोडण्यात आलेले आहे. परंतु, हे झाड धोकादायक बनले होते. त्या झाडावरुन मोठ्या प्रमाणावर कापसासारखा पदार्थ हवेत उडत होता. हे झाड तोडण्यासाठी महापालिका आणि 'पीएमआरडीए' यापैकी कोणाची परवानगी घ्यावी या संभ्रमावस्थेत (कंफ्यूजन) आम्ही होतो. झाड कापलेल्या ठिकाणाला पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून त्यांनी पाहणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आम्हाला पत्र दिले असून खुलासा मागितला आहे. आवश्यकतेनुसार आम्ही पीएमआरडीएला खुलासा सादर करून आमची बाजू मांडू. झाड तोडताना आम्ही परवानगी घेणे आवश्यक होते, यात शंका नाही. आम्ही शाळेच्या आवारातील अन्य झाडांचे जतन केले आहे. झाडांना आम्ही देखील जपतो. परंतु, हे झाड धोकादायक बनले होते. पीएमआरडीएला आम्ही उत्तर देणार आहोत. त्यानंतर त्यांच्याकडून जो प्रतिसाद येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू. याविषयी पीएमआरडीएचे अधिकारी विवेक डुबेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की पीएमआरडीएने वृक्ष तोडीबाबत पवार पब्लिक स्कूलला नोटीस बजावली आहे. आमचे अधिकारी व सर्व्हेअर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शाळेचे उत्तर आल्यावर याविषयी बोलता येईल. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.
वृक्ष तोडण्यासाठी शासनाचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम आहेत. स्थानिक पातळीवर वृक्ष प्राधिकरण समित्याही गठीत करण्यात आलेल्या असतात. कोणत्याही प्रकारचे झाड तोडायचे असल्यास प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असते. कोणत्याही प्रकारचे झाड परवानगीशिवाय तोडणे हा दखलपात्र गुन्हा आहे. वृक्ष तोडीबाबत दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तीला एक दिवस ते वर्षाचा तुरुंगवास घडू शकतो, किंवा आर्थिक दंड आकारण्यात येतो. तसेच, दोन्ही स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच तोडलेल्या झाडावर पक्ष्यांची घरटी असतील, तर वन्यजीवांची शिकार करण्याच्या कलमाखालीही कारवाई केली जाऊ शकते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.