पुण्यात रस्त्यावर भरताहेत 'ओपन बार'

राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पदपथावरच 'ओपन बार' सुरू झाले आहेत. मद्यविक्री दुकानांमधून दारू विकत घेतल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडत बाटल्यांच्या बाटल्या रिचवल्या जात आहेत. या प्रकारामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढत चालला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 03:27 pm
Open bars in pune

रस्त्यावर भरताहेत 'ओपन बार'

राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचे दुर्लक्ष : महापालिकेसमोर पदपथावरच ठिय्या

राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पदपथावरच 'ओपन बार' सुरू झाले आहेत. मद्यविक्री दुकानांमधून दारू विकत घेतल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडत बाटल्यांच्या बाटल्या रिचवल्या जात आहेत. या प्रकारामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढत चालला आहे. कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याने मद्यपी बेबंदपणाने वागत आहेत. यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांसह महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहराच्या विविध भागातील वाईन शॉपसमोर हे चित्र पाहायला मिळते आहे.

 एकीकडे महिला सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनलेला असताना दुसरीकडे मात्र रस्त्यावरील या प्रकारांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. शहरात रस्त्यावरील लूटमारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच रस्त्यावर बसून राजरोसपणे दारू प्यायची अलिखित मोकळीक मिळाली तर अशा स्वरूपाच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेसमोर असलेल्या वाईन शॉप बाहेरही अशाच प्रकारे रस्त्यावर आणि पदपथावरच दारू पार्ट्या रंगत आहेत. पदपथावर बसूनच राजरोस दारू ढोसण्यापर्यंत मद्यपींची मजल गेली आहे. अनेकजण उभे राहून दारू पित असतात. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर घडत असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस आणि महापालिका डोळ्यांवर कातडे ओढून बसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक नेमलेले असतात. यासोबतच मोर्चे, आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात येतो. दिवसभरात पोलिसांची अनेक वाहने ये-जा करीत असतात. गस्तीवरील पोलिसांचीही चक्कर होत असते. तरीदेखील याकडे कोणाचेही लक्ष जात नाही हे विशेष.

स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौकात असलेल्या वाईन शॉपमधून मद्य खरेदी केल्यानंतर अनेकजण उड्डाणपुलाखाली किंवा पुलाच्या कठड्यावर बसतात. या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. स्थानिक पोलिसांकडून मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकाराकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणावरून चालत जाणेही महिलांना धोक्याचे वाटू लागले आहे. महिलांची छेड काढण्याचे प्रकारही सर्रास घडू लागले आहेत. त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव केले जातात. महिला रस्त्याने जात असताना विचित्र आवाज काढले जातात. भीतीपोटी महिला तक्रार करायला धजावत नाहीत. पोलिसांकडूनही या प्रकाराची गांभीर्याने दाखल घेतली जात नाही.

महापालिकेसमोर पीएमपी वाहकाची हुशारी

'सीविक मिरर'च्या पाहणीत महापालिकेसमोर एका पीएमपी वाहकाची हुशारी दिसून आली. त्याने स्वत:जवळील बॅगेमध्ये पाण्याची बाटली सोबत आणली होती. वाईन शॉपमधून दारू विकत घेतली. पाण्याच्या बाटलीमध्ये दारू ओतली. दारूची बाटली तिथेच टाकून हा वाहक महापालिकेच्या दिशेने निघूनही गेला. दांडेकर पूल चौकामध्ये असलेल्या वाईन शॉप बाहेरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. या ठिकाणी देखील दुकानामधून मद्य विकत घेतल्यानंतर चौकात मोकळ्या जागेवर बसून दारू प्यायली जाते. मोक्याच्या ठिकाणी आणि रहदारीच्या परिसरात असे प्रकार घडत असतानाही याकडे यंत्रणा डोळेझाक करीत आहे. वाईन शॉपचालक दुकानाबाहेर आमची जबाबदारी नाही असे म्हणून हात झटकतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. नियमांच्या आड लपल्याने वाईन शॉपवर कारवाई करण्यात अडचणी येतात. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याचे आढळून आल्यास कलम ६८ व ८४ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभाग संबंधितांना तीन हजार रुपयांपर्यंतचा दंड करू शकतो. याबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest