संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरात प्रत्यक्षात लाखापेक्षा अधिक पाळीव श्वान असण्याची शक्यता आहे. मात्र, यातील फक्त आठ हजार नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच परवाना घेतला आहे. तसेच ३२२ नागरिकांनी पाळीव मांजरासाठी परवाना घेतला आहे.
पाळीव कुत्रा किंवा मांजरासाठी वर्षाला फक्त पन्नास रूपये शुल्क असूनही अनेकजण परवाना घेत नाहीत. त्यामुळे पाळीव कुत्र्यांना किंवा मांजरांना अँटीरेबीज आणि नसबंदी करता येत नसल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी ‘सीविक मिरर’ ला दिली.
केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार कुत्रा पाळण्यासाठी परवाना आवश्यक आहे. देशातील गुरूग्राम, लखनौ, इंदूर, बेंगळुरू, गाझियाबाद आणि पुणे शहरासाठी हा नियम केला आहे. पाळीव प्राण्यांची नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया आहे. पाळीव कुत्र्यांचे प्रमाणपत्र ( जेथून कुत्रा खरेदी केले होते) जातीचा प्रकार , पशु वैद्यकीय आणि लसीकरण तपशील अपलोड करणे आवश्यक आहे. यासह पशु वैद्यकीय डॉक्टरांकडून रेबीज इंजेक्शन प्रमाणपत्र, नसबंदी आणि लसीकरण सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणी नंतर एक धातूचा टोकन क्रमांक दिला जातो. तो कुत्र्याच्या गळ्यातील कॉलरवर असतो. यासाठी पाचशे रूपये दहा वर्षांसाठी नोंदणी शुल्क आहे. देशातील काही राज्यात उदाहरणार्थ हरियाणात या धातूच्या टोकनशिवाय कुत्रा आढळल्यास कुत्र्याला महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी घेऊन जातात. मालकाला दररोज ५० रूपये दंड भरावा लागतो.
नोएडा शहरात १ मार्च २०२३ पासून मालकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण किंवा नसबंदी करण्यासाठी उशीर झाल्यास दोन हजार महिना दंड आकारला जातो. पाळीव कुत्री सार्वजनिक ठिकाणी शौच करत असतील तर त्यांची साफ सफाई करण्याची जबाबदारी मालकाची असते. पाळीव प्राण्याने एखाद्याला इजा केल्यास संबंधित मालकाला दहा हजार दंड आकारला जातो. यासह जखमी व्यक्ती किंवा प्राण्यांच्या उपचाराचा खर्चही मालक देतील असा नियम आहे.
हरियाणा सरकारने राज्यात कुत्र्यांचे परवाने किंवा नोंदणी अनिवार्य केली आहे. कुत्र्यांचे हल्ले किंवा चावण्याच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हरियाणा सरकारने कुत्र्यांसाठी डॉक्टर परवाना घेणे अनिवार्य केले आहे. नविन नियमांमध्ये प्रति मालक एकच कुत्रा पाळणे समाविष्ट केले आहे. शिवाय हल्ला किंवा चावण्यापासून रोखण्यासाठी मालकांनी कुत्र्याच्या तोंडाला मास्क लावले पाहिजे असा नियम केला गेला आहे. त्यामुळे नोएडा आणि हरियाणाप्रमाणे कडक नियम पुणे शहरातील पाळीव प्राण्यांसाठी, मालकांसाठी होऊ शकतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे शहरात केवळ आठ हजारजणांनी आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी परवाना घेतला आहे. ३२२ पाळीव मांजरासाठी परवाना घेतला आहे. प्रत्यक्षात शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या लाखांपेक्षा अधिक आहे. नागरिकांनी आपला पाळीव कुत्रा परवाना घ्यावा, त्यासाठी प्रति वर्षे पन्नास रूपये तर एक रक्कमी पाचशे रूपये दहा वर्षांसाठी शुल्क आहे. ’’
- डॉ. सारिका फुंडे , मुख्य पशू वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, पुणे महापालिका