संग्रहित छायाचित्र
राज्यातील शहर असो किंवा गाव येथील शेवटच्या माणसापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेची कमी पडत आहे. राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा (Contaminated water) होत असल्याचा अहवाल राज्याचे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. पुणे (PMC) व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) हद्दीतील तपासलेल्या एक टक्का पिण्याच्या पाण्याचे नमूने दूषित आहेत, तर पुणे जिल्ह्यातील ३.३ टक्के पाण्याचे नमूने दूषित आहेत. याचा अर्थ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून एक लाख तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात साडेचार लाख नागरिक दूषित पाणी पित आहेत.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत नागरिकांना पाणीपुरवठा केलेल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांचे अणुजीव व रासायनिक घटकांचे विश्लेषण करून शास्त्रोक्तपणे तपासणी केली जाते. आरोग्य प्रयोगशाळेसह राज्यात मिनी, उपविभागीय व महापालिकेचे प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळेत स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या नमुने नियमित तपासले जातात. पाण्याचे नमुने तपासून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना उपाययोजनांसंदर्भात सांगितले जाते. मात्र, यावर उपाययोजना होतेच, याची शाश्वती देता येत नाही. कारण पुढच्या वेळी पाणीपुरवठा होणाऱ्या इतर ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाते. यामध्ये मिनी, उपविभागीय व महापालिकेच्या प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासल्यानंतर राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत हे पाणी नमुने पाठविले जाते. त्यामुळे शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल मिळेल याची खात्री नसते.
राज्य आरोग्य प्रयोगशाळेला जानेवारी २०२४ मध्ये पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून १६ हजार ८५१ पिण्याच्या पाण्याचे नमुने प्राप्त झाले होते. त्यापैकी एक टक्का पाण्याचे नमुने दूषित होते. तर ग्रामीण भागातील तीन हजार ४४५ पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी साधारणत: साडेतीन टक्के पाणी नमुने दूषित असल्याचा अहवाल राज्य प्रयोगशाळेने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी लोकसंख्येचा विचार केला तर तब्बल दररोज चार लाख लोक दूषित पाणी पीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजार व त्यावरील औषधोपचारासाठी लोकांचे कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील शहर व ग्रामीण भागात उन्हाळ्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढले
राज्यातील नांदेड जिल्ह्यात २६.४ टक्के, बीड जिल्ह्यात १८.७ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.६ टक्के, जालना १२ टक्के तर उस्मानाबाद १७.७ टक्के दूषित पाणीपुरवठा होतो. कोकणातील रत्नागिरीत ११ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ टक्के दूषित पाणीपुरवठा होतो. तर ठाणे शहरात १६.७ टक्के, भंडारा २२.२ व गोंदियातील तीस टक्के शहरी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल राज्य प्रयोगशाळेने दिला आहे.
राज्य आरोग्य प्रयोगशाळेत राज्यभरातून आलेल्या शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांचे अणुजीव व रासायनिक घटकांची तपासणी केली जाते. दर महिन्याला त्याचा अहवाल आरोग्य संचालकांना पाठविला जातो. अनेक शहरात आणि ग्रामीण भागात होणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यातील पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणी करून संबंधितांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी सांगितले जाते.
- डॉ. विनोद फल्ले, उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे
दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, विषमज्वरसारखे आजार होऊ शकतात. पाण्याचे क्लोरिनेशन नीट झाले नसल्यास अपचनाचे विकार होऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे चांगल्या पद्धतीने क्लोरिनेशन करून पाण्य पाणी शंभर टक्के उकळून व थंड करून पिणे आवश्यक आहे.
- डॉ. सुभाष कोकणे, फिजिशीयन