ओ कयामात ! सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाची झाली अशी दुर्दशा
जपान-भारत मैत्रीचे प्रतीक म्हणून नरवीर तान्हाजी मालुसरे रस्त्यावर (Sinhagad Road) उभारलेले पु. ल. देशपांडे उद्यान (Deshpande Park) ओकोयामा उद्यान म्हणून ओळखले जाते. पुण्यामधील प्रमुख उद्यानांपैकी एक असलेल्या या उद्यानाची सध्या दुरवस्था झालेली आहे. उद्यानातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणवर साचलेल्या शेवाळामुळे दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा रंग बदलला असून घाणीची बुडबुडे असलेले तवंग पाण्यावर दिसत. त्यातच सर्वत्र बेसुमार डास गुणगुणत आहेत. त्यामुळे हे उद्यान आहे कि पालिकेचे डास पैदास केंद्र असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुणेकर नागरिक आणि पर्यटकांनी तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी-कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पुणेकरांच्या पसंतीच्या या उद्यानाची सध्याची स्थिती पाहून ओकोयामा उद्यानाऐवजी ओ कयामत उद्यान म्हणून त्याचे वर्णन करावे कि काय असा प्रश्न पडला आहे.
अबाल-वृद्ध पुणेकरांची पसंती असलेल्या या उद्यानात आसपासच्या परिसरातील नागरिक सकाळ-संध्याकाळी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. तसेच एक वेगळ्या प्रकारची उद्यान रचना पाहण्यासाठी म्हणून पर्यटक आवर्जून याला भेट देतात. मात्र, सध्याची तेथील स्थिती पाहता सगळेजण निराश झाले आहेत. त्यातल्या त्यात फिरायला येणारे नागरिक फारच निराश झाल्याचे आढळते. आपल्या आवडीच्या उद्यानाची स्थिती बदलण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ते निराश झाले आहेत.
जपान-भारत मैत्रीचे प्रतीक असलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानाच्या दुरवस्थेमुळे सध्या तेथे डासांचे राज्य आहे. जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणवर शेवाळे साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा रंग बदलला असून घाणीची बुडबुडे आलेले तवंग पाण्यावर दिसू लागले आहेत. पु. ल. देशपांडे उद्यान जपानी उद्यान पद्धतीच्या रचनेवर वसवलेले शहरातील प्रमुख उद्यान. पुणे आणि जपानमधील ओकोयामा शहराच्या मैत्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ हे उद्यान तयार करण्यात आले. ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर ते विकसित करण्यात आले असून उद्यानाला ओकोयामा उद्यान म्हणूनच ओळखले जात होते.
कालांतराने त्याला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले. या उद्यानात अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १२० एकरच्या परिसरात हे उद्यान विस्तारलेले आहे. प्रत्येक ऋतुमधील बदल, निसर्गसौंदर्य लोकांना अनुभवता यावे याची विशेष दक्षता उद्यानात घेण्यात आलेली आहे. उद्यानातील भरपूर हिरवळ, सुंदर आणि टुमदार टेकड्या, कॉफी, तुळस आणि अनेक औषधी वनस्पतींची लागवड येथे केली आहे. यासोबत विविध प्रकारची फुलझाडे देखील मोठ्या प्रमाणावर लावली आहे.
उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पाण्याची तळी आणि पाण्याचे जीवंत झरे. उद्यानाचे सौंदर्य अधिक खुलवणाऱ्या पाण्यावर विविध प्रजातींचे पक्षी सतत येत असतात. परंतु, हीच तळी, झरे आणि कारंजी असलेली ठिकाणे शेवाळग्रस्त झाली आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जागा माती आणि घाणीने बुजल्याने पाणी एकाच जागी अडून राहात आहे. त्यामुळे प्रवाह रोखलेले पाणी साठून दुर्गंधी पसरली आहे. संपूर्ण पुण्यामधून विशेषत: पुण्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागातून तसेच मध्यवस्तीमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक उद्यानात सकाळी 'मॉर्निंग वॉक' साठी येतात. तसेच, संध्याकाळी देखील फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सकाळ-संध्याकाळ व्यायाम करायला, शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक येत असतात. तसेच,पर्यटक, पुणेकरांची मोठी गर्दी येथे असते. त्यामुळे उद्यानाच्या सौंदर्याला बाधा आणणारी दुर्गंधी दूर करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांकडून महापालिका शुल्क वसूल करते. मात्र, त्याचा वापर उद्यानाच्या देखभालीच्या कामांवर खर्च होत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. एकीकडे शहरात डेंग्यू, ताप आदी साथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने होणारे आजारदेखील आरोग्य विभागाची डोकेदुखी ठरत आहेत. अलीकडच्या काळात प्रतिबंधात्मक फवारणीही कमी झालेली आहे. त्यामुळे उद्यानातील डास नागरिकांना चावल्याने त्यांनाही आजाराची लागण होऊ शकते. महापालिकेकडून नागरीकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
कुटुंबासह खराडी येथून उद्यानात फिरायला आलेले स्वप्नील रमेश पठारे याबाबत म्हणाले, की 'मी माझ्या कुटुंबासह पु. ल. देशपांडे उद्यानात फिरायला आलो होतो. त्यावेळी पाण्याच्या तळ्यात आणि कारंजे असलेल्या ठिकाणी शेवाळे, घाण पाहायला मिळाली. माझ्या लहान मुलाला डासदेखील चावले. वेळीच उपाययोजना केली नाही तर येणारे आजारपण हे विकतचे आजारपण ठरेल.'
पर्वती येथील लक्ष्मीनगरचे रहिवासी असलेले अमित पायगुडे म्हणाले, मी या उद्यानात फिरण्यासाठी नियमित येतो. उद्यानातील कारंजे आणि तलाव परिसरात सध्या शेवाळे साठले आहे. येथे पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाण्यावर शेवाळ आणि घाणीचे बुडबुडे असलेले तवंग आलेले आहेत. या ठिकाणी स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. डासांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याठिकाणी शेवाळे साठले असेल तर ते तात्काळ स्वच्छ केले जाईल. तेथे पाणी वाहून जाण्यामध्ये काही अडथळे असतील. त्यामुळे पाणी साठले असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.