जेसीबी चालकाची हत्या करणाऱ्या दोन मित्रांना अटक
आर्थिक वादातून जेसीबी चालकाची दोन मित्रांनीच हत्या (killed) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरातील खोडदरोड येथे गुरूवारी (दि. २५) घडली. या प्रकरणी अवघ्या २४ तासात नारायणगाव (Narayangaon) पोलीसांनी दोन जणांना अटक (arrested) केली आहे.
साहेबराव नामदेव भुतांबरे (वय ४५, रा. कोतूळ ता. अकोले जि. अहमदनगर सध्या रा. पाटेखैरेमळा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे) असे हत्या झालेल्या जेसीबी चालकाचे नाव आहे. तर प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे (वय ३१, रा. अमरवाडी खोडद ता. जुन्नर जि. पुणे) आणि देवराम विठठल कोकाटे (वय २७, रा. कुंभारआळी खोडद ता. जुन्नर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नारायणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नारायणगावच्या हद्दीतील खोडद रस्त्यावरील तेलओढ्याच्या वरील पडीक जमिनीत एका व्यक्तीचा मृतदेह पोलीसांना सापडला होता. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस संबंधित मृताच्या नातेवाईकांनी पोलीसांशी संपर्क साधून हा मृतदेह जेसीबी चालक साहेबराव यांचा असल्याचे सांगितले.
साहेबराव हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने ते नारायणगाव येथे राहत होते. ते जेसीबी चालवत होते. ते जेसीबी चालक असल्याचे समजताच पोलीसांनी घटनेच्या रात्री त्याला २ इसमांसोबत खोडदरोडच्या दिशेने जाताना पाहिले होते. त्यामुळे सोबत असलेल्या दोन मित्रांना पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसांनी कसून चौकशी केली असता अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून दोघांनी साहेबराव यांची हत्या केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. सध्या नारायणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.