मोनिका तेलंगे, मंथन तेलंगे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालातून एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. पुण्यातील कचरा वेचक आई आणि मुलाने एकत्र परीक्षा देत दहावीत घवघवीत यश मिळवले आहे. ४५ वर्षीय आईला ५१.८ टक्के तर मुलाला ६४ टक्के मार्क मिळाले आहेत.
मोनिका तेलंगे असे आईचे नाव असून मंथन तेलंगे असे मुलाचे नाव आहे. मोनिका या कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांना आपली दहावी पुर्ण करायची होती. त्यामुळे, कचरा गाडी येण्याची वाट पाहत असताना मंथनच्या शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून येणारे अभ्यासाचे संदेश मोनिका वाचत होत्या. त्यानंतर मंथन आणि मोनिकाने परीक्षेसाठी एकत्र अभ्यास केला.
अखेर परीक्षेत मुलाला ६४ टक्के तर आईला ५१.८ टक्के असे घवघवीत यश मिळविले. सध्या मंथनचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न असून तो आता नीटची तयारी करणार आहे. तर मोनिका यांना नर्सिंगचा कोर्स आणि बारावीची तयारी करायची आहे. यांच्या जिद्दीची ही कहाणी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे, बालवयात मोनिका यांचा विवाह झाला होता. त्यावेळी त्या नववी शिकल्या होत्या. मात्र संसार आणि मुलांमुळे त्यांना पुढचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही. त्यात त्यांच्यावर नियतीनेदेखील घाला घातला आणि अचानक त्यांच्या पतीचे निधन झाले. लॉकडाऊन सुरु असताना त्यांचा मुलगा ऑनलाईन शिक्षण घेत होता. याच दरम्यान मुलासोबत मोनिका या अभ्यास करत होत्या. अखेर यंदा दहावीची परीक्षा देत त्यांनी आपले स्वप्न पुर्ण केले.