महापालिका करणार रुग्णालयांवर ‘उपचार’
अमोल अवचिते
महापालिकेच्या रुग्णालयांमधील समस्या आणि सेवांचा दर्जा यामुळे सामान्य नागरिक त्यात उपचार घेणे टाळतात. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाढत्या महागाईच्या काळात खासगी रुग्णालयात सर्वसान्यांना उपचार घेणे परवड नाहीत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातात. असे असले तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या असुविधा यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा रुग्णालयांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. रुग्णांनी उपचारासाठी यावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आता रुग्णालयांमधील ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक उपचारांसह चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत. रुग्णालयांमधील खाटांची संख्या १६० ने वाढणार आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.
या आराखड्यात पहिल्या टप्प्यात भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालय, मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा यामध्ये समावेश केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय, हडपसर येथील मगर रुग्णालय आणि सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, डॉक्टर, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.
रुग्णांना चांगली वागणूक मिळणे, स्वच्छता याकडेही लक्ष दिले जाणार आहे. महापालिकेच्या या कामात खासगी कंपन्यांनी मदत करण्याची तयारी दाखविल्याने ‘सीएसआर’ च्या माध्यमातून निधी आणि उपकरणे, वैद्यकीय साहित्य घेतले जाणार आहे. ‘‘पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांत सुधारणा करण्यात येणार आहेत. रुग्णांना अद्ययावत पद्धतीने उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून त्याला आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या तिन्ही रुग्णालयांत अद्ययावत सेवा सुरू केली जाईल. सध्या या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत, पण भविष्यात येथे आणखी चांगल्या सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे,’’ अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
अत्याधुनिक उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
महापालिकेकडून रुग्णांना मोफत सेवा पुरवली जाते. यासाठी महापालिकेकडून पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीसुद्धा रुग्णांना उपचार तर सोडा, पण पायाभूत सुविधाही योग्य प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून नेहमीच केल्या जातात. यापुढे रुग्णांना अत्याधुनिक उपचार देता यावे, यासाठी महापालिकेकडून तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे.
महापालिकेच्या विविध रुग्णालयांची सद्यस्थिती...
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.