मुंबई विद्यापीठाची पदवी फक्त दोन हजार रुपयांत; सायबर गुन्हेगारांनी चक्क सोशल मीडियावर केली जाहिरात

चक्क सोशल मीडियावर जाहिरात करून मुंबई विद्यापीठाची पदवी फक्त दोन हजार रुपयांत देण्याचा गोरखधंदा पुण्यातील अभिजित खेडकर या जागृत सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई विद्यापीठाची पदवी फक्त दोन हजार रुपयांत

घरबसल्या पदवी मिळवण्याचे दाखवले आमिष

चक्क सोशल मीडियावर जाहिरात करून मुंबई विद्यापीठाची पदवी फक्त दोन हजार रुपयांत देण्याचा गोरखधंदा पुण्यातील अभिजित खेडकर या  जागृत सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी छायाचित्रकार अभिजित खेडकर (Abhijit Khedkar) यांना फेसबुकवर एक पोस्ट दिसली. त्यामध्ये बारा ते पंधरा हजार रुपयांत घरबसल्या मुंबई विद्यापीठाची पदवी मिळावा, असा मजकूर होता. या माध्यमातून लोकांची फसवणूक होतेय का, हे तपासण्यासाठी त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमाकांवर खेडकर यांनी संपर्क केला. तेव्हा ॲॅडव्हान्स म्हणून दोन हजार रुपये पाठवा, असे त्यांना सांगण्यात आले. खेडकर यांनी दोन हजार रुपये ऑनलाईन पाठवताच त्यांना व्हाॅट्स्ॲॅपवर विज्ञान शाखेतील पदवी आली. 

ही पदवी सरकारी आणि खासगी नोकरीसाठी चालेल, असे समोरच्या व्यक्तीने सांगितल्याची माहिती खेडकर यांनी  ‘साीविक मिरर’ला दिली. याबाबत पोलिसांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Fake Degrees)

पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये परराज्यातून पदवीच नव्हे तर डॉक्टरेट मिळविणारे शेकडो आहेत. ते त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर ही पदवी लावून फिरत असतात. मात्र राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची पदवी इतकी सहज मिळत नव्हती. मात्र, आता चक्क मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी घरबसल्या बारा ते पंधरा हजार रुपयात मिळवा, अशी जाहिरात तीन ते चार दिवसांपूर्वी फेसबुकवर फिरत होती. त्यामुळे उत्सुकता म्हणून पुणे शहरातील अभिजित खेडकर यांनी फेसबुकवर दिलेल्या मोबाईल क्रमाकांवर संपर्क केला असता त्यांनी ॲॅडव्हान्स रुपये पाठवा, असे सांगितले. खेडकर यांनी दोन हजार रुपये ऑनलाईन पाठविले. काही क्षणार्धात त्यांच्या व्हॉटस्‌अॅपवर चक्क विज्ञान शाखेतील पदवीचे गुणपत्रक झळकले. मूळ गुणपत्रक हवे असल्यास उर्वरित पैसे पाठवा, असा संदेशही नंतर आला.

विज्ञानशाखेच्या रिझल्टमध्ये आठही विषयात प्रत्येकी शंभर पैकी ९० गुण तर काही विषयात ८० गुण खेडकरांनी प्राप्त झाले आहेत. विज्ञानशाखेत ८०० पैकी ७१९ गुण मिळवून सीजीपीआय ९.४१ सह खेडकरांनी प्रावीण्य मिळविले आहे. रिझल्ट १० जून २०२३ ला जाहीर झाले असल्याचे या गुणपत्रकात नमूद असून त्यावर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन संचालकांची सही आहे.

मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) बोगस पदवी देणाऱ्या रॅकेटमध्ये विद्यापीठातीलच काही कर्मचारी आणि अधिकारी असू शकतात, अशी शंका  खेडकर यांनी ‘सीविक मिरर’कडे व्यक्त केली. ही बोगस पदवी गुणपत्रिका राज्यातच नसून देशभरात कितीजणांनी मिळविली आहे, हे सांगणे अवघड असून त्याचा सायबर पोलिसांनी सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्याचे खेडकर यांनी नमूद केले. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार आहे. यासह यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, असेही खेडकर यांनी सांगितले.

...तर पदवीची शहानिशा शक्य

राज्यातच नव्हे तर देशातील अनेक राजकीय नेतेमंडळी आपल्या शिक्षणाबद्दलची खोटी माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात देतात. यामध्ये नेते डॉक्टरेट, वकील, पदवीधर यांचादेखील समावेश असतो. त्यांच्या पदवीची शहानिशा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ नसतो. मात्र, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने १९९० पासूनची दहावी व बारावीची गुणपत्रिका ऑनलाईन टाकली आहे. त्यामुळे एखाद्याची किमान दहावी किंवा बारावी झाली आहे का, याची शहानिशा सहज करता येते. मात्र पदवीधर असल्यास अशा पदवीधारकांची शहानिशा कशी करावी, याचे उत्तर आता नसले तरी भविष्यात सर्व पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका ऑनलाईन टाकल्यास ते शक्य होईल, असे खेडकर म्हणाले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest