Pune : कार्यकर्त्यांकडून स्वागत आमदारांना पडले महागात

पुणे शहरातील एका आमदार महोदयांना कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चांगलाच महागात पडला आहे. उरुसात फटाके वाजविल्यामुळे हात भाजला, तर दुसऱ्या घटनेत एका जयंती उत्सवात आतषबाजीमुळे डोक्यावरचे केस जळाले.

कार्यकर्त्यांकडून स्वागत आमदारांना पडले महागात

उरुसात फटाके वाजविल्यामुळे हात भाजला तर एका जयंती उत्सवात आतषबाजीमुळे डोक्यावरचे केस जळाले

पुणे शहरातील एका आमदार महोदयांना कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चांगलाच महागात पडला आहे. उरुसात फटाके वाजविल्यामुळे हात भाजला, तर दुसऱ्या घटनेत एका जयंती उत्सवात आतषबाजीमुळे डोक्यावरचे केस जळाले. (Pune City) 

आमदार एका उरुसामध्ये गेल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची दहा हजारांची माळ लावली. या फटाक्यांचा दणदणाट एवढा होता की, आमदारांना पुढेही जाता येईना आणि मागेही जाता येईना. त्यामुळे काही वेळ त्यांना एकाच ठिकाणी थांबावे लागले. त्याच वेळी काही फटाके उडून आमदारांच्या अंगावर फुटले. यात त्यांचा उजवा हात भाजला. काही दिवसांनी एका जयंती उत्सवात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदारांच्या स्वागतावेळी जोरदार आतषबाजी केली. यामध्ये आमदारांच्या डोक्यावरील काही केस जळाले. त्यामुळे आमदारांनी काही वेळातच तेथून काढता पाय घेत थेट हेअर कटिंग सलून गाठले आणि जळालेले केस काढून टाकले.

पुणे शहरात सत्ताधारी आमदार जोरात आहेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका येणार असल्यामुळे आमदार स्थानिक कार्यकर्त्यांना वर्गणी सढळ हाताने देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते विविध उत्सव, उरूस , महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यासाठी डाॅल्बी, फटाक्यांचा धुमधडाका व आतषबाजी करतात. या कार्यक्रमांना साहजिकच वर्गणी देणाऱ्यांची उपस्थिती आवर्जून असते. कार्यक्रमाला आमदार आले तर कार्यकर्त्यांचा जोश वाढतो. आमदार मोटारीतून उतरण्याआधीच फटाक्यांची माळ लावतात, तर कोणी फटाक्यांची आतषबाजी करतात. पण हा उत्साह कसा एखाद्या पाहुण्याला किंवा आमदारांना धोकादायक ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच शहरात आली.

शहरातील एक आमदार मतदारसंघातील एका उरुसाला गेले होते. ते पोहोचताच कार्यकर्त्यांनी मोठ्या फटाक्यांची माळ लावली. त्यामुळे आमदारांना एकाच ठिकाणी थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान काही फटाके उडून त्यांच्या अंगावर फुटले. यामध्ये आमदारांचा उजवा हात भाजला. त्यानंतर कार्यक्रम कसाबसा आटोपून आमदारांनी थेट रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेऊन ते घरी पोहोचले. मात्र पुढील पंधरा ते वीस दिवस त्यांना अंघोळ करताना भाजलेल्या जखमेची काळजी घ्यावी लागली.

आमदाराच्या हातावरील जखम बरी होत नाही तोवर  त्यांच्यासोबत असाच आणखी एक प्रसंग घडला. ते एका समाजाच्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी डाॅल्बीच्या आवाजात अबालवृद्ध बेफाम होऊन नाचत होते. आमदार तेथे येताच काहींनी त्यांना चक्क उचलून घेतले. काही जण प्रेमाने त्यांचे हात-पाय ओढत होते. काही जण त्यांचे शर्ट ओढत होते. अशा अवस्थेत आमदारांना घेऊन जात असताना एकाने फटाक्याचा शाॅट उडवला. तो शाॅट चक्क आमदारांच्या कानाजवळून गेला. यामध्ये ते वाचले असले तरी त्यांच्या डोक्याचे काही केस मात्र जळाले. त्यामुळे कार्यक्रम कसाबसा आटोपून आमदारांनी थेट हेअर कटिंग सलून गाठले. तेथे हेअर कट मारूनच ते घरी गेले.

महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपून दोन वर्ष होत आहेत त्यामुळे शहरातील उत्सव, समारंभ  अशा कार्यक्रमांपासून ते विवाह समारंभात शहरातील आमदारांनी उपस्थिती हमखास असते. एवढेच नाही तर महापुरुषांच्या जयंतीलासुद्धा आमदारांनी उपस्थित राहावे, अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा असते.

 त्यासाठी आमदारांनी घसघशीत वर्गणी दिलेली असते. त्यामुळे आमदारांचे जंगी स्वागत करणे आलेच. यासाठी आतषबाजीसह फटाक्यांची मोठीच्या मोठी माळ लावली जाते. यामध्ये फटाक्यांचा कानठळ्या बसणारा आवाजदेखील आमदार कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी सहन करतात. मात्र वरील प्रसंगामुळे ‘‘स्वागत-सत्कार समारंभ नको, पण उत्साही कार्यकर्त्यांना आवरा, असे आदेश या आमदारांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दिले आहेत.  

विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासोबत घडलेल्या‘त्या’ घटनेची आठवण

येरवड्यात एका शाळेच्या उद्घाटनासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन नभोवाणीमंत्री विठ्ठलराव गाडगीळ आले होते. शाळेचे उद्घाटन झाल्यानंतर हायड्रोजनचे फुगे हवेत सोडायचे होते. त्यामुळे एकाने हायड्रोजनच्या फुग्यांचा धागा कापण्यासाठी कात्री देण्याऐवजी चक्क पेटती मेणबत्ती गाडगीळ यांच्या हाती दिली. गाडगीळ यांनी पेटती मेणबत्ती फुग्यांच्या धाग्याजवळ नेताच हायड्रोजन फुग्यांचा स्फोट होऊन गाडगीळांना भाजले होते. त्यानंतर महापालिकेने कधीच हायड्रोजन फुग्यांचा वापर केला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest