मेट्रो धावतेय पण येरवडावासियांना नाही उपयोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे उद्घाटन केले. मेट्रो सुरूही झाली. मात्र, येरवड्यातून जात असलेल्या या मेट्रोचा येरवड्यातील नागरिकांना फायदा नाही. येथे मेट्रो स्थानकच नसल्याने येरवडावासियांना मेट्रोकडे नुसते पाहावे लागत आहे. (Pune Metro)
येरवडा येथील येथील मेट्रो स्थानक आचारसंहितेत अडकले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपल्यावरच याचे उर्वरित काम सुरू होणार आहे. महामेट्रोच्या स्थानकावरील जिना रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. या जिन्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अरुंद होणार होते. यासह रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन भविष्यात येरवड्याकडे जाण्यास व येण्यास मोठा अडथळा ठरणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी येथील जिन्याला विरोध केला होता. त्यामुळे गेली चार महिने येरवडा मेट्रो स्थानकाचे काम थांबले होते.
गेल्या महिन्यात वनाझ ते रामवाडीच्या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो सुरू झाली. मात्र, येरवडा मेट्रो स्थानकाचे काम अपूर्ण असल्यामुळे ते एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. आता निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. मेट्रो स्थानक सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानकाचे उर्वरित काम लोकसेभेच्या निकालानंतर अर्थात जूनमध्ये सुरू होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) येरवडा मेट्रोस्थानकाचा जिना आणि लिफ्ट रस्त्याच्या मधोमध बांधले जात होते. त्यामुळे येरवडा बस थांब्याच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होत होती. रस्ता रुंदीकरणासाठी जागा शिल्लक असताना महामेट्रोने मध्येच जिना उभारला होता. विशेष म्हणजे महापालिकेने परवानगी दिली नसतानाही मेट्रोने जिना उभारत असल्याचे समोर आले होते. जिन्याचे बांधकाम काढून घेईपर्यंत मेट्रोचे काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली होती. त्यामुळे महामेट्रोने येरवडा मेट्रो स्थानकाचे आणि जिन्याचे काम बंद केले होते.
पर्णकुटी चौकातून गाडीतळाकडे वळताना १५ फूट रस्त्यावर महामेट्रोने कॉलम उभारल्यामुळे येरवड्याकडे जाताना अडथळा निर्माण होत होता. याशिवाय रस्त्याच्या मधोमध जिना बांधल्याने रस्ता अरुंद झाला. परिणामी पर्णकुटी चौकातून येणाऱ्या वाहनांची जिन्याच्या बांधकामाजवळ सातत्याने कोंडी होती. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे मेट्रो स्थानकासाठी गाडीतळ चौकात उभारणारा जिना स्थलांतर करून मागील बाजूस बांधावा, अशी मागणी रहिवाशांनी मेट्रोकडे केली होती. सुरुवातीला महामेट्रो त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते डॅनिअल लांडगे आणि स्थानिक नागरिकांनी ऑक्टोबर महिन्यात मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम बंद पाडले होते.
दरम्यान, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर जिना मागे घेण्याची भूमिका घेतली. मात्र, वनाझ ते रामवाडीच्या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्ग सुरू करण्याची घाई असल्यामुळे गेली पाच महिने येरवड्याच्या स्थानकाकडे दुर्लक्ष केले. गेल्या महिन्यात रुबी हॉल ते रामवाडी या तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी येरवडा मेट्रो स्थानक एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याचे महामेट्रोने सांगितले होते. आता मात्र, घुमजाव करीत ‘‘सध्या आचारसंहिता सुरू असल्याने स्थानक सुरू करता येत नाही,’’ अशी भूमिका मेट्रोने घेतली आहे.
दीड लाख लोकसंख्या असूनही येरवड्याची उपेक्षा
येरवडा व परिसरातील दीड लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यास येथील कष्टकरी, मध्यमवर्गीय, विद्यार्थी, चाकरमानी, खासगी नोकरदारांना मेट्रोमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये जाता येऊ शकते. त्यामुळे मेट्रोचे प्रवासीसुद्धा वाढू शकतात. मात्र, महामेट्रो येरवडा स्थानकाकडे गांभीर्याने पाहात नसल्याची टीका रहिवाशांनी केली आहे.
प्रवासी संख्या घटणार
येरवडा ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर हा मेट्रो मार्ग असल्यामुळे प्रवासी संख्या घटणार आहे. पूर्वी हा मार्ग येरवडा, शास्त्रीनगर, रामवाडी असा थेट होता. मात्र, आगाखान पॅलेस हेरिटेज वास्तूमुळे मार्ग बदलण्यात आले, असे बोलले जाते. दिल्लीमध्ये अनेक हेरिटेज वास्तूच्या जवळून मेट्रो धावतात. तेथे एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम का, याचे कोडे अजूनपर्यंत पुणेकरांना उलगडले नाही. भारतीय पुरातत्त्व विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘‘आगाखान पॅलेस समोरून मेट्रो गेली असती तरी काहीच अडचण आली नसती,’’ असे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला कल्याणीनगर येथून मेट्रो गेल्यामुळे प्रवाशांना फायदा नसून बांधकाम व्यावसायिकांना चार एफएसआय जागा मिळणार असल्यामुळे मेट्रो मार्ग बदलल्याची चर्चा आहे.