मे रेकाॅर्डब्रेक ब्रेकडाऊनचा!

सार्वजनिक वाहतूक सेवेचा कणा असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) सेवा पुरती कोलमडली आहे. जानेवारी महिन्यात दररोज २१ बस रस्त्यातच बंद पडत होत्या. मे महिन्यात हे प्रमाण ६१ वर पोहचले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Wed, 7 Jun 2023
  • 12:12 am
मे रेकाॅर्डब्रेक ब्रेकडाऊनचा!

मे रेकाॅर्डब्रेक ब्रेकडाऊनचा!

महिन्यात दररोज पडल्या ६१ पीएमपी बस बंद, पाच महिन्यांत ब्रेकडाऊन तिप्पट

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

सार्वजनिक वाहतूक सेवेचा कणा असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) सेवा पुरती कोलमडली आहे. जानेवारी महिन्यात दररोज २१ बस रस्त्यातच बंद पडत होत्या. मे महिन्यात हे प्रमाण ६१ वर पोहचले आहे.

अवघ्या पाच महिन्यांत ब्रेकडाऊनचे प्रमाण तिप्पट झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे एकप्रकारे सार्वजनिक वाहतूक सेवेचे कंबरडेच मोडले असल्याचे दिसून येते. यातील ५५ ते ६० टक्के बस या खासगी कंत्राटदारांच्या आहेत, हे विशेष.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) परिसरातील सुमारे ७५ ते ७७ लाख लोकसंख्येला सेवा देण्याचे काम पीएमपी करते. दररोज सरासरी साडेअकरा ते बारा लाख प्रवासी पीएमपी सेवेचा वापर करतात. पीएमपीच्या ताफ्यात २,१०० बस असून, दररोज सुमारे १,६०० ते १,७०० बस रस्त्यावर धावतात. सध्या या वाहतूक सेवेला ब्रेकडाऊनचे ग्रहण लागले असून, त्यात सेवेचा कणा पुरता कोलमडून पडला असल्याचे पीएमपीने दिलेल्या ब्रेकडाऊनच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जानेवारी महिन्यात पीएमपीने सरासरी दररोज १,७१२ बस रस्त्यावर सोडल्या होत्या. त्यातील ७१२ बस या पीएमपीच्या तर १,००१ बस ठेकेदारांच्या होत्या. पीएमपीच्या ताफ्यातील ८ आणि ठेकेदाराच्या १८ अशा २६ बस दररोज बंद पडल्या. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ३८ बस १३ तारखेला बंद पडल्या होत्या. या महिन्यात सरासरी दररोज १२ लाख ४ हजार ४३८ प्रवाशांनी प्रवास केला होता. गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात होती. प्रवासी संख्या अधिक असली तरी या महिन्यात तुलनेने ब्रेकडाऊनचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून ब्रेकडाऊनमध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आली. फेब्रुवारीच्या ६ ते १९ तारखेपर्यंत दररोज सरासरी ३० बस बंद पडल्या. यातील १९ बस ठेकेदारांच्या होत्या.

एप्रिल महिन्यात दररोज १,६८७ बस रस्त्यावर होत्या. दररोज सरासरी ११ लाख ३४ हजार ५६९ प्रवाशांनी पीएमपीचा वापर केला. एप्रिल महिन्यात दररोज ५४ बस बंद पडत होत्या. त्यातील २२ बस पीएमपीच्या आणि ३२ बस ठेकेदारांच्या होत्या. या महिन्यात १३ एप्रिलला ९९ आणि १८ एप्रिलला ९३ बसने आपली मान टाकली.  

पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी म्हणाले, ‘‘खासगी ठेकेदाराला शासनाने प्रतिबस ६० लाख रुपये अनुदान दिले आहे. त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी त्याचीच असते. मात्र, सुस्थितीतील बस रस्त्यावर सोडण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाचीच आहे. कमीत कमी देखभाल खर्च करून जास्तीत जास्त नफा कमावण्याचे ठेकेदाराचे उद्दिष्ट असू शकते. खराब बस रस्त्यावर आणणाऱ्या ठेकेदाराला दंड ठोठावला पाहिजे. क्षमता नसलेल्या पीएमपीच्या बसही रस्त्यावर येता कामा नये. पूर्वी सिल्व्हर जुबली (१९४१), नंतर पीएमटी आणि २००७ पासून पीएमपीएमएल कंपनी स्थापन झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचा ८० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असताना ब्रेकडाऊन कमी करण्यात पीएमपीला अपयश आले आहे. नियोजनशून्य कारभार आणि अकार्यक्षमतेमुळे ब्रेकडाऊन वाढले आहे.’’

‘‘ठेकेदारांची ई-वाहने पूर्ण चार्ज होत नसल्याने मध्येच बंद पडत आहेत. सीएनजी आणि इतर बस ओव्हर हिटिंगमुळे बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. पीएमपीच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्याने देखभाल दुरुस्तीची कामे वाढली आहेत. ठेकेदारांना आम्ही त्यांच्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे असे नियमित कळवतो. ठेकेदाराची एखादी गाडी एका महिन्यात पाच वेळा बंद पडल्यास तिला आम्ही सेवेतून निलंबित करतो,’’ अशी माहिती पीएमपीचे कार्य व्यवस्थापक राजेश कुदळे यांनी दिली.

११ मे रोजी तब्बल १३६ बसचे ब्रेकडाऊन

मे महिन्यात उन्हाची काहिली सर्वाधिक होती. या काळात पीएमपीच्या ढिसाळ सेवेमुळे प्रवाशांची अक्षरशः होरपळ झाली. मे महिन्यात दररोज सरासरी १,६५५ बस रस्त्यावर धावत होत्या. त्यातील ६७४ बस पीएमपीच्या तर ९८१ बस ठेकेदारांच्या होत्या. दररोज ६१ बस रस्त्यात बंद पडल्या. यातील २३ बस पीएमपीच्या होत्या. तर, ३८ बस ठेकेदारांच्या होत्या. मे महिन्याच्या ११ तारखेला सर्वाधिक १३६ बसने रस्त्यांवरच मान टाकली. यातील तब्बल ९७ बस ठेकेदाराच्या होत्या. तर, १० तारखेला १२६ बस बंद पडल्या. त्यातील ९५ बस ठेकेदारांच्या होत्या. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर बस बंद पडण्याचा गेल्या पाच महिन्यांतील विक्रम याच महिन्यात झाला. बस रस्त्यातच बंद पडल्यास एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये बसावे लागते. त्यासाठी दुसऱ्या बसची रस्त्यावर उभे राहून वाट पाहावी लागते. प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्याचबरोबर रस्त्यात बस बंद पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. कामाचा कालावधी वाया गेल्याने पीएमपीचे देखील आर्थिक नुकसान होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest