संग्रहित छायाचित्र
पुण्यातील कात्रज घाटात भरधाव शिवशाही बसने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बसच्या चाकाखाली सापडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील कात्रज घाटातील हॉलीडे इन हॉटेलच्या समोर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.
रोहीत मारुती वीर (वय २२, रा. निनाई मंदीराजवळ, तुळसण ता. कराड जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर बस चालक संभाजी कुंभार (वय ३४, रा. सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चालकाचा अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पोलीस शिपाई सचिन तात्याराव पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव शिवशाही बस पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जात असताना कात्रज घाटात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण रोहीत बसच्या थेट पाठीमागील चाकाखाली सापडला. बसच्या चाकाखाली सापडल्यामुळे रोहीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती पोलीस ठाण्यात बस चालक संभाजी कुमार यांच्या विरोधात २७९, ३०४ (अ) मो. वा. का. कायदा कलम ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती पोलीस करत आहेत.