संग्रहित छायाचित्र
अमोल अवचिते
सर्वसामान्य कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना अल्पदरात डायलिसिसची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात एका संस्थेबरोबर करार केला आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून १३ पैकी ११ मशीन बंद असल्याची तक्रार सौरभ पवार या तरुणाने महापालिकेकडे ऑनलाईन केली आहे. मात्र मशीन सुरु आहे की बंद आहेत, यावरुन महापालिकेचे अधिकारी आणि रुग्णालयाचे अधीक्षक यांच्या संभ्रम असल्याचे उघड होत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेणाऱ्यांची रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत डायलिसिसच्या मशिनची संख्या फारच कमी आहे. यासोबतच अद्ययावत सुविधाही उपलब्ध नाहीत. महापालिका ‘डायलिसिस सेवा खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर चालवते. ते काम खासगी संस्थेचे असल्याचे कारण वैद्यकीय अधिकारी देत आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण कोणी ठेवायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची स्थिती आहे. कमला नेहरू रुग्णालयातील मशिन गेली अनेक दिवस बंद आहेत, याची माहितीही महापालिकेच्या आरोग्य विभागाला नव्हती. मात्र आता किती मशीन नेमक्या सुरु आहेत यावरुन संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णांना सुमारे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागतात. मात्र या सुविधेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना फक्त चारशे रुपयांमध्ये डायलिसिसची सुविधा मिळते. महापालिकेने ज्या संस्थेसोबत करार केला आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
डायलिसिस अल्प दरात उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. मात्र ही सुविधा पुरवण्यास महापालिकेला तसेच खासगी संस्थेला अपयश येत असल्याचे दिसन येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून १३ पैकी तब्बल ११ मशीन बंद असल्याचे एका रुग्णाचा नातेवाईक मयुर देशमाने याने "सीविक मिरर"शी बोलताना सांगितले.
कमला नेहरु रुग्णालयातील सर्व डायलिसिस मशीन सुरु आहेत. रुग्णांची संख्या जेवढ्या प्रमाणात आहे. तेवढ्या प्रमाणात मशीन सुरु ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांना कोणतीही गैरसोय होत नाही.
- डाॅ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख महानगरपालिका
रुग्णालयातील सात मशीन सुरु आहेत. इतर मशीन केवळ रुग्णांची संख्या कमी असल्याने बंद आहेत. रुग्ण संख्या वाढली की या मशीन सुरु केल्या जातात. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास करावा लागत नाही.
- डाॅ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी
कमला नेहरु रुग्णालयातील डायलिसिस सुविधेची जबाबदारी खासगी संस्थेची आहे. डायलिसिसच्या सध्या सहा मशीन सुरु आहेत. पालिकेकडून संबंधित संस्थेसोबत पुन्हा एकदा करार केला जाणार आहे, अशी माहिती आहे. त्यानंतर मशीन सुरु होतील, असा अंदाज आहे.
- डाॅ. सुरज वाणी, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरु रुग्णालय
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.