बिबट्या
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगावातील एका ८० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार गुरूवारी घडला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास सावरगाव गावातील शेतकऱ्यांना शेजारील विहिरीतून अचानक बिबट्यांचा आवाज ऐकू आला. शेतकऱ्यांने जवळ जाऊन पाहिल्यास जवळपास ८० फूट खोल उघड्या विहिरीत बिबट्या तरंगत असल्याचे दिसून आले. त्यानंतर शेतकऱ्याने तात्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळाताच वन्यजीव एसओएस माणिकडोह बिबट्या बचाव केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने पिंजरा विहिरीत सोडला. तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. सुदैवाने यात बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश ढगे म्हणाले की, “प्राथमिक तपासणीनंतर बिबट्या सुमारे २ वर्षांचा तरुण मादी असल्याचे आढळून आले. बिबट्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही आणि तो सक्रिय आणि निरोगी आहे. सध्या तो निरीक्षणाखाली आहे. आम्ही त्याला लवकरच योग्य ते उपचार करून जंगलात सोडू.”