लोहगाव विमानतळावर खासगी कंपनीकडून नियमबाह्य वाहतूक व्यवस्थापन व दंडवसुलीचा प्रकार उघडकीस
लोहगाव विमानतळ परिसरात एका खासगी कंपनीकडून वाहनांवर नियमबाह्य कारवाई केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. जॅमर लावून पोलिसांच्या कारवाईच्या अधिकारावरच अतिक्रमण केल्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या वाहनांवर खासगी कंपनीचे कर्मचारी कारवाई करत असताना पोलीस कर्मचारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. विशेष म्हणजे, खासगी कंपनीचे कर्मचारी ऑनलाईन दंडवसुलीही करीत आहेत.
खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून गुगल पेद्वारे एका खासगी खात्यावर दंड वसूल केला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. लोहगाव विमानतळावरील या प्रकाराचा एका नागरिकाने व्हीडीओही बनविला आहे. यामध्ये विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर ‘नो पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जॅमर लावला जात आहे. टोईंग व्हॅनचालकाशी एक व्यक्ती वाद घालत आहे. भारत विकास ग्रूप (बीव्हीजी) कंपनीची ही टोईंग व्हॅन असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे, एक वाहतूक पोलीस कर्मचारी या टोईंग व्हॅनच्या शेजारी बसलेला आहे. या कारवाईबद्दल विचारणा केल्यावर याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तो सांगतो. या घटनेची पाहणी करण्यासाठी ‘मिरर’च्या टीमने विमानतळावर भेट दिली. टोईंग व्हॅनचालकाने आपण पोलिसांसाठी नव्हे, तर पेबल्स इन्फ्रा-टेक प्रायव्हेट लिमिटेडसाठी काम करत असल्याचे सांगितले.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि पेबल्स इन्फ्रा-टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात १ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या विकास करारानुसार पेबल्स इन्फ्रा-टेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे विमानतळावरील बहुस्तरीय कार पार्किंग सुविधा चालवणार आहे. त्याचबरोबर आसपासच्या क्षेत्रातील वाहतुकीचे व्यवस्थापन करणार आहे. मात्र, बीव्हीजीचे कर्मचारी विमानतळाबाहेर असलेल्या रस्त्यावरील वाहनांनाही जॅमर लावून दंड वसूल करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
विमानतळाचे संचालक संतोष डोके यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, पुणे विमानतळाबाहेरील रस्ता हा भारतीय हवाई दल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खासगी कंत्राटदारांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडूनच बहुमजली पार्किंगचे व्यवस्थापन होत आहे. आम्ही त्यांना दंड वसूल करण्याची परवानगी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, “पुणे विमानतळाबाहेर काही लोकांनी माझी गाडी अडविली. मला सात हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. मी कारण विचारल्यावर मी गाडी नो पार्किंग झोनमध्ये पार्क केली होती, असे त्यांनी सांगितले. आपण वाहतूक पोलीस कर्मचारी आहात का, अशी विचारणा केली असता त्यांनी बीव्हीजी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, दोन हजार रुपयांवर तडजोड करण्याचीही तयारीही दर्शविली. माझा प्रश्न असा आहे की, खासगी कंपनी महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर दंड वसूलच कसा करू शकते. हा वाहतूक पोलिसांचा अधिकार आहे. खासगी कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्याबाबत भारतीय विमानतळ प्राधीकरण आणि वाहतूक पोलीस विभागाने स्पष्टीकरण द्यायला हवे.
‘मिरर’ ने बीव्हीजी कंपनीचे काम करणाऱ्या बाळू नावाच्या कर्मचाऱ्याला विचारले, तर त्यांनी टोईंग व्हॅनवर काम करणारे लाेक बीव्हीजी कंपनीचे नसल्याचे सांगितले. बीव्हीजीचे असिस्टंट जनरल मॅनेजर अमोल पाटील यांनी ‘मिरर’ शी बोलताना सांगितले की, आम्ही पेबल्स इन्फ्राला एरो मॉल आणि विमानतळाबाहेरील रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ पुरवित आहोत. आम्हाला पेबल्स इन्फ्राकडून विमानतळाच्या ५०० मीटरच्या बाहेर नियमभंग करणाऱ्या वाहनांना जॅमर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमच्याकडे फक्त मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट आहे. पुणे विमानतळ आणि एरो मॉलमध्ये दररोज १०० ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देतो.
पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही खासगी कंपनीला किंवा व्यक्तीला विमानतळाबाहेर जॅमर लावण्याचे किंवा दंड वसूल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. मात्र, एरोमॉल आणि विमानतळ परिसरात वाहतूक व्यवस्थापनासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने काही खासगी कंपन्यांशी करार केला आहे.
पोलिसांनी कोणत्याही खासगी कंपनीला दंड वसूल करण्याची किंवा कारवाई करण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरण याबाबत अधिक स्पष्टीकरण देईल. आम्ही वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. पुणे विमानतळासमोरील रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ते कायदेशीर कारवाई करतात.
- जगदीश सातव, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.