Jambhulwadi lake : जांभूळवाडी तलावाला लागले दुर्गंधीचे ग्रहण
आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात ड्रेनेजचे पाणी जात असल्याने दुर्गंधी वाढली असून तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णीही वाढली आहे. तलावाचे सौंदर्यीकरण आणि संवर्धनासाठी तब्बल १३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, मात्र, ही सगळी कामे सध्या ठप्प पडली आहेत. तलावाच्या परिसरात बोटॅनिकल गार्डन, अभ्यासिका, प्रार्थना मंदिर, ॲम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, गणेश विसर्जन घाट उभारले जाणे अपेक्षित होते. मात्र केवळ जॉगिंग ट्रॅकचेच थोडेसे काम झाले आहे. बाकी सर्व कामे अद्याप प्रलंबित पडली आहेत.
जांभूळवाडी तलावामध्ये आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी व परिसरात असणाऱ्या रहिवासी वस्तीतील ड्रेनेज लाईनचे पाणी जमा होते. त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे तलावात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. तलावातील मासे मरून पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने तलाव भरलेला नाही. त्यामुळे येथील घाण पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे दुर्गंधीमध्ये आणखी भर पडली आहे.
जांभूळवाडी तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या अनेक योजना आखण्यात आल्या. मात्र, ती कामेच पुढे सरकलेली नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वेढला गेला असून तलावाचे सौंदर्य हरविले आहे. या झाडांच्या आडोशाला मद्यपींचे अड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे तलावाला भेट देणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलावाच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. मात्र, ड्रेनेज लाईनच्या बांधकामामुळे ट्रॅक उखडला गेला आहे. त्यावर चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
तलावाच्या बाजूने असलेल्या ड्रेनेजची मुख्य लाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. फक्त त्याची जोडणी बाकी आहे. सध्या ड्रेनेजचे पाणी तलावात जात आहे. मात्र महिनाभरात हे जोडणीचे काम पूर्ण होऊन तलावात जाणारे घाण पाणी पूर्ण बंद होईल. मुख्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक किंवा विकास कामे करण्यासाठी आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. - राजेश धुमाळ, शाखा अभियंता, पुणे महानगरपालिका ड्रेनेज विभाग
ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे जॉगिंग ट्रॅक खराब झालेले आहेत. तसेच या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. ओढ्यावरील पूल तयार नसल्यामुळे तीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक अपूर्ण आहे. विकास कामासाठीचा निधी शिल्लक आहे. मात्र, त्याचा विनियोग झालेला नाही.- श्रीकांत लिपाने, सामाजिक कार्यकर्ते
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.