Jam Road : ‘जॅम’रोड

शहरातील भर वर्दळीच्या भागात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर जे होणे अपेक्षित होते तेच झालं. जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता भर कामाच्या वेळी जॅम रोड झाला. पक्षाच्या बैठकीसाठी आलेले हजारो कार्यकर्ते, त्यांच्या चारचाकी वाहनांमुळे जंगली महाराज रस्ता अभूतपूर्व कोंडीत अडकला. दुचाकी वाहनांचे सोडा सामान्य पुणेकरांना रस्त्यावरून चालणे अशक्य झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 19 May 2023
  • 12:10 am
‘जॅम’रोड

‘जॅम’रोड

फ्लेक्स, बॅनरच्या अचाट यशानंतर 'पार्टी विथ अ डिफरन्स'ने केला जेएम रोडचा...

निखील घोरपडे / विशाल शिर्के

feedback@civicmirror.in

शहरातील भर वर्दळीच्या भागात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर जे होणे अपेक्षित होते तेच झालं. जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता भर कामाच्या वेळी जॅम रोड झाला. पक्षाच्या बैठकीसाठी आलेले हजारो कार्यकर्ते, त्यांच्या चारचाकी वाहनांमुळे जंगली महाराज रस्ता अभूतपूर्व कोंडीत अडकला. दुचाकी वाहनांचे सोडा सामान्य पुणेकरांना रस्त्यावरून चालणे अशक्य झाले.

भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे प्रदेश नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि. १८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री, स्थानिक आमदार, खासदार, प्रदेशपातळीवरील पदाधिकारी, स्थानिक नेते यांच्याशी नड्डा यांनी संवाद साधला. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत दोन टप्प्यात ही बैठक झाली. सुरुवातीच्या टप्प्यात मंत्र्यांशी आणि नंतर आमदार-खासदारांशी संवाद साधला गेला. त्यासाठी सकाळपासूनच मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमस्थळी गर्दी झाली होती.

राष्ट्रीय अध्यक्ष शहरात येणार म्हणून त्यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी फलक लावले होते. कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर दुतर्फा मोठमोठे स्वागतफलक लावण्यात आले आहेत. जंगली महाराज रस्त्यावर जणू फलकांची झालरच उभारली होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही स्थानिक नेत्यांनीही जोरदार फलकबाजी केली. अनेक फलकांनी पदपथ अडवले होते. काही स्वागत कमानींनी रस्त्याची जागा व्यापली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच पादचाऱ्यांना चालताना डोके सांभाळून पुढे जावे लागत होते. फलक उभारताना त्याच्या उंचीचे भान राखले पाहिजे, यासाठी मात्र डोके वापरल्याचे दिसून आले नाही. पार्टी विथ डिफरन्स अशा घोषणा भाजप उठसूठ देत असला तरी पक्षाचे कथित वेगळेपण गुरुवारच्या कार्यक्रमात वाहून गेले होते.

सगळा जंगली महाराज रस्ता आणि आसपासच्या गल्ल्या चारचाकी, दुचाकी वाहनांनी ओसंडून वाहात होत्या. वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे येथे रितसर उल्लंघन होत होते आणि या सर्वामुळे पुणेकरांची कमालीची गैरसोय झाली. रस्त्यावर दुहेरी-तिहेरी पार्किंग झाले. नो पार्किंगचा नियम बाजूला ठेवला गेला होता. पीएमपीच्या बसमध्ये चढण्यासाठी आणि बस थांबवण्यासाठी जागाच नव्हती. यामुळे रस्त्यावर केवळ गोंधळ आणि गोंधळ दिसून येत होता. जंगली महाराज रस्त्यावर येणाऱ्या गल्ल्या आणि बोळांमध्ये तर भीषण परिस्थिती होती. वाहनांच्या गर्दीने सारा भाग गुदमरून गेला होता. बालगंधर्व रंगमंदिरा शेजारी असलेल्या पुलावर वाहनांची रांग पोहोचली होती. 

पार्किंग नियमांचे उल्लंघन करणारी वाहने उचलण्यासाठी पोलिसांची वाहने फिरत होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई करण्याचे टाळले. चौकात लावलेल्या अर्ध्या डझनहून अधिक होर्डिंगमुळे पदपथावरून चालणे अवघड झाले होते. यातील होर्डिंगमुळे दिशादर्शक फलक, नो पार्किंगचे फलक कोठे आहे की नाही हेच कळत नव्हते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर प्रथमच नड्डा यांनी कर्नाटकचा शेजार असलेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. अपेक्षेप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, असे आवाहन करण्यासाठीच ही बैठक बोलावली होती. पुढील वर्षी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षभर कोणतीही अपेक्षा न धरता पक्षासाठी काम करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

बाणेरमध्ये राहण्यास असलेले समीर आहुजा जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. गुरुवारच्या घटनेबाबत ते म्हणाले की, माझी दुचाकी पार्क करण्यासाठी मला पूर्ण जंगली महाराज रस्त्यावर कोठेही जागा मिळाली नाही. अखेर घोले रोडवर दुचाकी लावून अर्धा कि.मी. पायी चालत इच्छित कार्यालय गाठले.

फळ विक्रेत्या बकुळ पटेल म्हणाल्या की,  पार्किंग केलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे माझा स्टॉल पूर्ण झाकला गेला होता. यामुळे आज काही व्यापार झाला नाही. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी वाहने हटविण्याची घोषणा केली. मात्र, एकाही वाहनाने आपली जागा सोडली नाही.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest