संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरात कोयता दाखवून दहशत माजविण्याचे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे तसेच दहशत पसरविण्याची प्रकार सुरुच आहे. सिंहगड रस्त्यावर दुचाकीचालक तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील ५० हजारांची रोकड लुटली. या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत एका २५ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालक चोरटा आणि साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्यावर ही घटना घडली.
फिर्यादी दुचाकीचालत तरुण शुक्रवारी रात्रीघरी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले. ‘गाडी हळू का चालवतोय’,अशी विचारणा करुन चोरट्यांनी त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. दुचाकीचालक तरुणाला गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगितले. चोरट्यांनी त्याला शिवीगाळ केली.
चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणाच्या खिशातील ५० हजारांची रोकड लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.