संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ या शाळेने विभागीय पातळीवर अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात प्रथम क्रमांक पटकावून एकवीस लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. नागपूरच्या सरस्वती विद्यालयाला दुसरा तर पुण्याच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल शाळेला तिसरा क्रमांक मिळाला
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या स्पर्धेसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने यश आले.
कृत्रिम तारांगण असलेली आशिया खंडातील एकमेव शाळा, अवकाश निरीक्षणासाठी वेधशाळेची सोय, ३७००० पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, गणित खेळघर, भव्य प्रयोगशाळा, भव्य मैदान, जगभरातील १२५ खनिजांचे भूवस्तूसंग्रहालय, दुर्मीळ दिव्यांचे संग्रहालय अशी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जयंतीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षात या पारितोषिकाच्या रूपाने पुन्हा एकदा शाळेचे नाणे खणखणीत वाजले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिलेल्या या शाळेने इतिहास घडविला आहे. अगदी सामान्य घरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून शिक्षण देऊन, त्यांचा सर्वांगीण विकास करून, समाजामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून समाजाची सेवा करण्यासाठी चांगले नागरिक घडविणाऱ्या या शाळेच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप आहे.
शाळेने राबवलेल्या काही महत्त्वपूर्ण उपक्रमांची यादी खालीलप्रमाणे :
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उल्लेखाशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा, मराठी साहित्याचा आणि मराठी व्याकरणाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशा या शाळेमधील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शाळेमधून व्याख्याने, क्षेत्रभेटी यांचे आयोजन करून सतत केले जाते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने दुधीभोपळा, दोडकी, वांगी, मिरच्या, कांदा व अळू यांचे उत्पादन परसबागेत घेतलेले आहे. शाळा सदर भाज्या जशा उपलब्ध होतील तशा पोषण आहारासाठी उपयोगात आणते.
पर्यावरण संवर्धनासाठी शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवतात. विद्यार्थी दर शनिवारी सभा घेऊन पुढील आठवड्यात करायच्या कामाची रूपरेषा ठरवतात. विद्यार्थी स्वत:च्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून इको ब्रिक्स तयार करतात. या ब्रिक्स सामाजिक संस्थांना देतात.
शाळेच्या इमारतीभोवती असणाऱ्या वृक्षांची देखभाल विद्यार्थी करतात. याशिवाय शाळेबाहेर जाऊन टेकड्यांवरही वृक्षारोपण केले जाते. स्वतः तयार केलेले सीडबॉल विविध ठिकाणी जाऊन टाकतात.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. हे विद्यार्थी स्वत:च्या परिसरामध्ये राहणाऱ्या जनतेचे स्वच्छता विषयक प्रबोधन करतात. विविध वर्गांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. वॉशरूममध्ये हँडवॉशचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. हे स्वच्छता दूत असणारे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात आणि त्यांना सुधारणा करण्यास प्रेरणा देतात.
विद्यार्थ्यांना शालेय परिसरातील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी नेले जाते. यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ, पुण्यातील विविध मार्गांवरील नीलफलक असलेल्या वास्तू, सिंहगड अशा ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासघटकाचे अध्यापन केले जाते.
शाळेतील शिक्षक स्वत:चे मोबाईल ॲप तयार करून त्यावर अध्यापन करतात. शिक्षक स्वत: विविध पीपीटी तयार करून त्यांचा वापर अध्यापनात करतात. शैक्षणिक कार्ड, तक्ते, खेळ तयार करून विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने अध्यापन करतात. शाळेमध्ये विविध दिवसांचे औचित्य साधून गगोला (गणिताची गोडी लावणे), पाय डे, शेकडो विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रात्यक्षिक असे उपक्रम घेतले जातात. शिक्षक स्वत: पुस्तके लिहितात.
शाळेने ICT प्रयोगशाळा उभारलेली आहे. यामध्ये आधुनिक संगणक ज्ञानाचा पाया भक्कम करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रम शाळेने तयार केलेला आहे. अद्ययावत ३१ संगणकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकज्ञानासाठी तयार केले जाते.
सुतारकाम, शेती व्यवस्थापन, प्लंबिंग, केटरिंग, इलेक्ट्रिशियन असे व्यवसाय मार्गदर्शन वर्ग शाळेने डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. येथे विद्यार्थी वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष कार्य करून व्यवसायात तयार होतात. प्लंबिंगमध्ये तुषार सिंचन प्रकल्प, रोबोट, मोबाईल स्टँड, पुस्तक स्टँड, कपडे सुकवण्याचे स्टँड तयार करतात. सुतारकामामध्ये लाकडी किचन तयार करतात. केटरिंगमध्ये केक तयार करतात. विद्यार्थी उटणे तयार करून त्याची विक्री करतात.
शाळेतील विद्यार्थी योगासन व कराटे स्पर्धा़मध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवतात. शाळेचे मैदान भव्य आहे. तेथे विविध खेळांचा सराव घेतला जातो. काही प्रशिक्षक विद्यार्थ्यांना दररोज मोफत मार्गदर्शक करतात. माजी विद्यार्थी आर्थिक साहाय्य करून क्रीडा साहित्य, मैदान निर्मिती (उदा. गोळाफेकीचे मैदान) करतात. पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम घेतले जातात.
विद्यार्थ्यांसाठी इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे (क्रांतिदिन), श्री. प्रांजल अक्कलकोटकर (लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर), श्री. किरण सबनीस (व्यवसाय मार्गदर्शन) अशा व्याख्यात्यांना निमंत्रण देऊन विद्यार्थांना वैचारिक मेजवानी दिली जाते. विद्यार्थ्यांची सामाजिक जडणघडण, सांस्कृतिक जडणघडण व मूल्यसंवर्धन यांसाठी या व्याख्यानांचा उपयोग होतो.
विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उत्तम राखण्यासाठी शाळा विशेष प्रयत्न करते आहे. शाळेमध्ये नेव्ही व एअरफोर्स असे दोन एनसीसी विभाग कार्यरत आहेत. त्यांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होतात. तसेच शाळेमध्ये स्काऊट-गाईडचे गट आहेत. विविध निवासी प्रशिक्षणासाठी या सर्व गटांतील विद्यार्थी जातात.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, मंथन, NMMS, इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असलेली इयत्ता सातवीची प्री-स्कॉलरशिप परीक्षा अशा विविध स्पर्धापरीक्षांमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊन यश मिळवत आहेत. या परीक्षांच्या निकालाचा आलेख वाढता दिसून येत आहे.
इयत्ता दहावीनंतर कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत, त्यांची माहिती शाळेकडूनच दिली जाते. एनडीए प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन करणारे व्याख्याते बोलवून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. चित्रकला, शिल्पकला, कथाकथन अशा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
विशेष बाबींचे औचित्य साधून शाळा दरवर्षी एक विशेष उपक्रम घेते. शाळेचे आद्यसंस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाचेनिमित्त साधून यावर्षी शाळेने संस्थापक सप्ताह आयोजित केला होता. यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नोंद झालेल्या लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या काळात महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र व शिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, लोकमान्य टिळकांच्या वंशज मा. डॉ. गीताली टिळक, माजी बालसाहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. न. म. जोशी, साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, व्याख्याते मोहन शेटे अशा अनेक मान्यवरांनी शाळेस भेट दिली आहे. विद्यार्थ्यांनी संस्थापकांच्या जीवनातून कोणता आदर्श घ्यावा, याबाबत हस्तलिखिते तयार केली आहेत.
अनेक माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमांतून शाळेसाठी देणगी मिळवली जाते. या देणगीमधून एकल पालक विद्यार्थी व गरजू विद्यार्थी यांना आर्थिक साहाय्य केले जाते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.