संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे शहरातील वाहनचालकांसाठी महत्वाची (Traffic Update)बातमी समोर आली आहे. डेक्कन भागातील भिडे पुलावरील (Bhide Bridge) वाहतूकीत बदल (Changes in traffic) करण्यात आले आहेत. या भागात पुणे महानगरपालिकेचे पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुढील दोन महिने भिडे पुलावरील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.
पुणे शहरात वाहतूकीची समस्या दिवसागणीक गंभीर बनत चालली आहे. त्यातच शहरात अनेक ठिकाणी पुणे मेट्रो तसेच महानगरपालिकेचे कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस आणखीच अडथळा निर्माण झाला आहे. अशाच आता डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (16 ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
'हे' आहेत पर्यायी मार्ग
केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे , तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा. भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.