पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव, तोयता आयएएस अधिकाऱ्याला अटक

५४ वर्षीय व्यक्ती पंतप्रधान कार्यालयातील डेप्युटी सेक्रेटरी असल्याचे सांगून तोयता आयएएस बनून फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तोयता आयएएस अधिकाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 31 May 2023
  • 10:37 am
IAS officer : पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव, तोयता आयएएस अधिकाऱ्याला अटक

संग्रहित छायाचित्र

औंध येथील बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशनच्या कार्यक्रमात झाला होता सहभागी

पुण्यातील बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मू-कश्मीर येथे मदतीसाठी पाठविण्याकरीता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सोहळ्यात ५४ वर्षीय व्यक्ती पंतप्रधान कार्यालयातील डेप्युटी सेक्रेटरी असल्याचे सांगून तोयता आयएएस बनून फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तोयता आयएएस अधिकाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.

वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा. रानवारा रो-हाऊस तेळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी औंध येथील सिंध हौसिंग सोसायटी येथे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी पाठविण्याकरीता रुग्णावाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाहूणे म्हणून आलेल्या एक व्यक्तीने आपले नाव डॉ. विनय देव असल्याचे सांगितले. तसेच आपण स्वत: आयएएस पदावर असून सध्या दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी पदावर असल्याचे सांगितले.

मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विनय देवकडे अधिक विचारणा केली असता त्याच्या आयएएस पदाबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलीसांनी ३० मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास विनय देवला राहत्या घरातून ताब्यात घेतले. ताब्यात घेवून पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वासुदेव विरोधात कलम ४१९, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest