संग्रहित छायाचित्र
स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.
पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टिदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतल्याची माहिती उघड झाली आहे. यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गेल्या नाहीत. कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे कलेक्टर बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकरांचे आयएएस अधिकारीपद वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. यूपीएससी आणि केंद्रीय नागरी सेवा न्यायप्राधिकरणाने (कॅट) ने विरोध केला असतानाही त्यांना आयएएस पद कसं देण्यात आलं? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलं, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रं दाखवून आयएएस मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.
कोण आहेत पूजा खेडकर?
पूजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली, तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
आयएएस होण्यासाठी पूजा खेडकरांनी काय काय केलं?
-पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट त्यांनी सादर केली.
-खेडकर त्याआधारे विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्या. जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आयएएस होणं अशक्य होतं.
-खेडकरांना जेव्हा आयएएसचा दर्जा मिळाला तेव्हा यूपीएससीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं. मात्र तब्ब्ल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलं.
-सर्वात आधी २२ एप्रिल २०२२ ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं. मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत खेडकर यांनी जाण्याचं टाळलं.
-त्यानंतर २६ मे २०२२ ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर २७ मे २०२२ ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी बोलावण्यात आलं. मात्र अनेकदा बोलावूनदेखील त्या वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाही.
-त्यानंतर १ जुलैला त्यांना पुन्हा एम्समध्ये बोलावण्यात आलं. पण त्या गेल्या नाही.
-२६ ऑगस्ट २०२२ ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या. तिथे त्यांना २ सप्टेंबरला एमआरआय चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं.
-खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली, याची तपासणी न्यूरो ओपथोमोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती. मात्र एम्स रुग्णालयातील ड्यूटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एमआरआयला उपस्थित राहिल्या नाहीत.
-त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला.
-मात्र त्यानंतर त्यांनी एका एमआरआय सेंटरमधून अहवाल आणून तो यूपीएससीला सादर केला. मात्र यूपीएससीने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात ‘कॅट’मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं.
-त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ ला ‘कॅट’ने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला.
-मात्र त्यानंतर असं काय घडलं की पूजा खेडकर यांनी सादर केलेलं एमआरआय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं? आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आयएएस दर्जा कसा देण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.