संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे विमानतळावर रविवारी (दि. ८) ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी एकूण २०४ विमानांची वाहतूक झाली, ज्यात १०२ विमानांचे उड्डाण झाले आणि १०२ विमाने पुण्यात उतरली. पुणे विमानतळाच्या इतिहासात ही सर्वाधिक विमानांची वाहतूक ठरली. यापूर्वीचा २०० विमानांचा विक्रम रविवारी मोडला.
हिवाळी हंगामात हवाई दलाने विमानतळ प्रशासनाला २१८ स्लॉट (विमान उतरण्याची व उड्डाणाची निर्धारित वेळ) उपलब्ध करून दिले होते, त्यापैकी २०६ स्लॉट विमान कंपन्यांनी आरक्षित केले होते. तथापि, प्रत्यक्षात १९४ विमानांची वाहतूक झाली होती. विमान कंपन्यांनी तिकिटांच्या दरवाढीसाठी स्लॉट आरक्षित करण्याची पद्धत अवलंबली होती.
माध्यमांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर विमानतळ प्रशासनाने विमान कंपन्यांना खडे बोल सुनावले आणि थेट कारवाईची चेतावणी दिली. यामुळे विमान कंपन्यांनी स्लॉटचा योग्य वापर करण्यास प्राधान्य दिले आणि परिणामी पुणे विमानतळावर रविवारी १०२ विमानांचे उड्डाण व १०२ विमाने उतरणे शक्य झाले.
रविवारी पुणे विमानतळावर ३२,००० हून अधिक प्रवाशांनी विमान सेवा घेतली.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी याबद्दल बोलताना सांगितले, "पुणे विमानतळाच्या इतिहासात रविवारी सर्वाधिक विमानांची वाहतूक झाली आहे. पुण्याहून वेगवेगळ्या शहरांसाठी नवा विमानसेवा सुरू झाली आहे, तसेच ज्या सेक्टरमध्ये प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्या सेक्टरमध्ये विमानांची संख्या वाढवली आहे. यामुळे विमान वाहतुकीत वाढ झाली आहे," असे ते म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.