संग्रहित छायाचित्र
अंतिम अपिलाच्या सुनावणी अभावी गेल्या आठ वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज के. चव्हाण यांनी हा निर्णय दिला.
हडपसरमध्ये सचिन शेलार याचा २०१४ मध्ये खून झाला होता. या खुनाच्या आरोपात अनिल तुकाराम सोमवंशी, अनिल सुभाष राख व इतर आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली होती. सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना संघटित गुन्हेगारी (मोक्का) व खुनाचे आरोपात दोषी धरून जन्मठेप व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात अनिल तुकाराम सोमवंशी व अनिल सुभाष राख यांनी अॅड. सचिन देवकर, अॅड. सचिन स्वामी आणि अॅड. अनिकेत थोरात यांचे मार्फत उच्च न्यायालय मुंबई येथे अपील दाखल केले होते.
अपीलात जामीन मिळण्यासाठी अनिल सोमवंशी व अनिल राख यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचे पुराव्यातून दिसून येत नाही. तसेच, इतर साक्षीदारांचे जबाब उशिरा नोंदवलेले आहेत. एक अर्जदार हा आठ वर्षांपासून व एक अर्जदार नऊ वर्षांपासून जेलमध्ये आहे. सदर अपिलाची अंतिम सुनावणी लवकर होणार नाही त्यामुळे दोघांनाही जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद आरोपीचे वकिलांनी केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज के. चव्हाण यांनी अर्जदारास जामीन मंजूर केला.