हॅलो, वधू पाहिजे का?; मॅट्रिमाॅनियल साईटवर दिला आमदारांचा मोबाईल क्रमांक; आमदार महोदयांच्या उरात भरवली धडकी
मॅट्रिमाॅनियल साईटवर (Matrimonial site) चक्क वधू पाहिजे म्हणून पुणे शहरातील एका आमदारांचा मोबाईल क्रमांक कोणीतरी खोडसाळपणे टाकला. या मॅट्रिमाॅनियल वेबसाईटच्या काॅल सेंटरवर व्हीआयपी मोबाईल क्रमांक आल्याने संबंधित आमदारांना सलग तीन दिवस हैराण करण्यात आले.
या आमदारांवर काय अपेक्षा आहेत, या प्रश्नापासून वैयक्तिक माहितीपर्यंतच्या प्रश्नांचा सातत्याने भडिमार करण्यात आला. यापासून पिच्छा सुटावा म्हधून आमदारांनी ‘‘माझे वय ६० वर्षे आहे,’’ असे ठोकून दिले. मॅट्रिमाॅनियल वेबसाईटवाले काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. ‘‘काहीही अडचण नाही सर. तरीदेखील आम्ही तुम्हाला अनुरुप वधू शोधून देऊ,’’ असे म्हणत मॅट्रिमाॅनियल वेबसाईटच्या प्रतिनिधींनी आधीच विवाहित असलेल्या या आमदार महोदयांच्या उरात धडकीच भरवली.
मॅट्रिमाॅनियल वेबसाईटचे प्रतिनिधींपासून सुटका करण्यासाठी आमदारांनी अखेर खासगी अडचण असल्याचे सांगून विवाह करण्यास असमर्थता दर्शविली. तरीही सदर प्रतिनिधी ऐकत नाही म्हटल्यावर आमदार महोदयांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्यांनी ठेवणीतील अस्सल पुणेरी शब्दांत समाचार घेतल्यावर मॅट्रिमाॅनियल वेबसाईटकडून फोनकाॅल येणे बंद झाले.
एखाद्याची गंमत करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून तिना मानसिक त्रास देणे हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. यामध्ये दंड व शिक्षाही होऊ शकते. मात्र एखाद्याने चक्क पुणे शहरातील आमदारांचा मोबाईल क्रमांक ‘वधू पाहिजे’ म्हणून मॅट्रिमोनल साईटवर टाकण्याची घटना विरळीच म्हणायला हवी. आमदारांचा मोबाईल क्रमांक व्हीआयपी क्रमांक असल्यामुळे मॅट्रिमोनियल साईटच्या प्रतिनिधींमध्ये त्यांना अनुरूप वधू शोधून देण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. याचा परिणाम म्हणून संबंधित आमदारांवर सलग तीन दिवस एकामागून एक काॅलचा भडिमार सुरू झाला. त्यामुळे आमदारांचा मोबाईल कायमचा बिझी जात होता. याचा त्रास आमदारांसह त्यांना काॅल करणा-यांनादेखील झाला.
नेहमी वेगवेगळे प्रश्न घेऊन मॅट्रिमाॅनियल वेबसाईटच्या काॅल सेंटरवरील फोन आमदारांना येत होते. काॅल सेंटरचे प्रतिनिधी आमदारांना ‘पुण्यात घर आहे का?’ ‘स्वत:चे आहे की भाडयाचे?’ ‘नोकरी करता की व्यवसाय?’ ‘तुमचे उत्पन्न किमी?’ अशाप्रश्नांसोबत वधूबाबत असलेली अपेक्षेच्या प्रश्नांची मालिका असायची.
आमदार महोदय कोणत्या तरी बैठकीत किंवा कार्यकर्त्यांसमवेत असायचे. त्यामुळे चिडून तत्काळ प्रतिक्रिया न देता ते शांतपणे ऐकून घेत. तर कधीकधी मोबाईल घेत नसत. मात्र, वेळी-अवेळी काॅल येणे सुरूच होते.
त्यामुळे आमदारांना यासंदर्भातील फोनकाॅलची धास्तीच बसली. कधीही त्यांचा फोन वाजायचा. त्यांना फोन डायव्हर्टही करता येत नव्हता. शेवटी त्यांनी की कटकट कायमची टाळण्यासाठी शक्कल लढविली. मॅट्रिमाॅनियल वेबसाईटवरून फोन येताच त्यांनी ‘‘माझे वय ६० वर्षे आहे,’’ असे सांगितले. त्यावर समोरच्या प्रतिनिधीने ‘‘काहीही अडचण नाही सर. तरीदेखील आम्ही तुम्हाला अनुरुप वधू शोधून मिळेल,’’ असे सांगितले. यावर चिडून आमदारांनी माझी काही खासगी अडचण असल्याचे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा सदर प्रतिनिधी ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव आमदारांनी अस्सल पुणेकरी भाषेत समाचार घेतला. त्यानंतर फोन बंद झाले आणि आमदार महोदयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
आमदारांची ही अवस्था, तर सर्वसामान्यांचे काय?
पुण्यातील आमदारांचा मोबाईल क्रमांक मॅट्रिमाॅनियल वेबसाईटवर कोणी टाकला, याबाबत अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. आमदारांना जर अशाप्रकार फोनवर मानसिक त्रास देण्यात येत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण दररोज अनेक काॅल सेंटरचे फोन नागरिकांच्या मोबाईलवर येत असतात. त्यावर कोणतीच कारवाई करता येत नाही.