संग्रहित छायाचित्र
राज्यातील मध्यवर्ती कारागृहात एखाद्या गुन्हेगाराला फाशी देणारा ‘जल्लाद’ हे पात्र चित्रपट आणि माध्यमांनी रंगविलेले आहे. कारागृहात ‘जल्लाद’ हे पदच अस्तिवात नाही. प्रत्यक्षात त्याला ‘हँगमॅन’ असे संबोधण्यात येते. हे काम एखाद्या कारागृहातील कर्मचाऱ्याला दिले जाते.
हा कर्मचारी गुन्हेगाराला फाशी देण्याअगोदर दोरखंड तयार करतो. त्यानंतर फाशी देणाऱ्या गुन्हेगाराच्या वजनाच्या पुतळ्याला दोरखंडाच्या माध्यमातून फाशी देण्याचा सराव करतो. त्यानंतर प्रत्यक्षात गुन्हेगाराला फाशी देताना त्याची भूमिका चोख बजावतो. देशात पन्नासपेक्षा अधिक कैदी फाशीच्या शिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर फाशीची अंमलबजावणी करण्यापर्यंत बराच कलावधी जातो. यामध्ये गुन्हेगार राष्ट्रपती यांच्याकडे दयायाचनेचा अर्ज दाखल करतात. राष्ट्रपतींनी दयायाचनेचा अर्ज फेटाळल्यानंतर फाशी देण्याची कार्यवाही सुरू होते. त्यानंतर संबंधित मध्यवर्ती कारागृहातील उंच व सशक्त अशा तुरुंग रक्षकावर ‘हँगमॅन’ची जबाबदारी सोपविली जाते. हा तुरुंगरक्षक नेमून दिलेल्या इतर कार्याप्रमाणे ही जबाबदारी स्वीकारतो आणि पार पाडतो.
‘हॅंगमॅन’कडे संबंधित फाशी देण्यात येणाऱ्या गुन्हेगाराची सर्व माहिती येते. त्याचे वजन व उंची किती आहे, हे महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे हा हँगमॅन दोरखंड वळायला लागतो. दोरखंड मजबूत होण्यासाठी त्याला तेल लावावे लागते. त्यानंतर फाशी देणाऱ्या गुन्हेगाराच्या वजन व उंचीच्या धातूचा पुतळा बनविला जाते. हा पुतळा घेऊन फाशीच्या खोलीत हा हँगमॅन त्यावर सराव करतो. एकाच खटक्यात गुन्हेगाराला फाशी लागणे आवश्यक असते. त्यासाठी तो अधूनमधून सराव करत असतो.
कार्यवाहीपूर्वी ‘हँगमॅन’चे समुपदेशन
हँगमॅनची भूमिका बजावताना त्याची मानसिक स्थिती बदलत असते. त्यासाठी मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांमार्फत त्याचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. दहशतवाद्याला फाशी देणाऱ्या हंंगमॅनचे नाव गोपनीय ठेवले जाते. एकदा फाशी देण्याचे काम झाले की तुरुंगरक्षक आपल्या नेहमीच्या कामावर रुजू होतो. केरळसारख्या राज्यात हँगमॅनला दोन लाख रुपयांचे बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाते. या स्वरूपाचे बक्षीस महाराष्ट्रात दिले जात नाही, पण विशेष सेवा पुरस्कार किंवा काही रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
सध्या येरवडा महिला कारागृहात पाच मुलांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदे या बहिणी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. कारण त्यांच्या क्षमा याचिकेवर निर्णय होण्याची प्रलंबित आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या काही दोषींमध्ये कसाब, जिंदा-सुखा आणि अभ्यंकर-जोशी हत्याकांडातील चार तरुण होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर अजमल कसाब साला २१ नोव्हेंबर २०१७ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी दिलेली ती शेवटची व्यक्ती होती. यापूर्वी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख दिवंगत जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले खलिस्तानी दहशतवादी जिंदा आणि सुखा यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती.
जल्लाद हा शब्दप्रयोग म्हणजे फक्त चित्रपट आणि माध्यमांनी रंगविलेले पात्र आहे. प्रत्यक्षात जल्लाद हे पद राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कोणत्याच कारागृहात नाही. फाशी देण्यासाठी कारागृहातीलच एखाद्या सशक्त अशा तुरुंगरक्षकाला काम दिले जाते. यासाठी त्याच्याकडून योग्य सराव करून घेतला जातो. गुन्हेगाराला फाशी देण्याचे कार्य संपताच तो नेहमीप्रमाणे दैनंदिन कामाला लागतो.
- योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक