महिलांना केंद्रबिंदू ठेऊन सरकारचे नवीन कायदे; अॅड. उज्वल निकम यांचे प्रतिपादन
आज देशामध्ये नवीन कायदे आले आहेत. या देशात जे कायदे आलेले आहेत, हे कायदे स्थापित करण्यामागचा उद्देश पाहिला तर महिला हा केंद्रबिंदू आहे. संस्कार देणारी आई, संसाराला मार्गदर्शन करणारी मार्गदर्शिका ही महिला असते. त्यामुळे महिला संरक्षणाच्या दृष्टीने हे नवीन कायदे करण्यात आले आहेत, असे मत व्यक्त करीत महिला न्यायाधीश व महिला वकिलांच्या शक्तीचा जयजयकार करण्यासाठी मी आवर्जून या कार्यक्रमाला आलो, असे विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात महिला न्यायाधीश व वकिलांचा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमही उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.
महेंद्र महाजन म्हणाले, भारतातील नारीशक्तीचे कौतुक होणे आवश्यक आहे. सध्याच्या न्यायालयीन व्यवस्थेत ३८ टक्के न्यायाधीश महिला आहेत. पुणे जिल्ह्यात वकील संघात पुरुषांबरोबर स्त्रियाही महत्त्वाचे खटले लढवितात, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या महिला न्यायाधीश व वकीलभगिनींचा सन्मान श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे होणे हे भूषणावह आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, नारीशक्तीचा सन्मान करून नवरात्रीची पूजा बांधण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करीत असतो. श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत लोकशाहीतील महत्त्वाचा स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था. त्यामुळे त्या व्यवस्थेतील न्यायाधीश व वकिलांचा सन्मान करण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.