संग्रहित छायाचित्र
राज्यभरात येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यासह पुण्यात गणेशभक्ताकडून व प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आज पुण्यात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. शहरात गणेशोत्सव काळात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश उत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. रात्री उशिरापर्यंत देखावे सुरु असतात. यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत १२ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आज जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते. गणेशोत्सव, नियमावली, गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली.
गणेशोत्सव बघण्यासाठी पुण्यात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे बारकाईने काळजी घेण्यासाठी पोलिस तयार आहेत. मेट्रो रात्री बारावाजेपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. विशेषत: ५ ते १० व्या दिवशी ही सेवा बारावाजेपर्यंत सुरु राहील. गणेश मंडळांना एकदा परवानगी घेतल्यास पुन्हा पाच वर्ष परवानगी घ्यायला लागणार नाही. पुण्यामध्ये राज्यासह देशातून लोक येत असतात. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन यांना तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणूक वेळेवर पार पाडण्यासंदर्भात चर्चा झाली. यंदापासून गणरायाचे विसर्जन वेळेत होण्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी ४.३० वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तसेच विसर्जन वेळेत होण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला गणेश मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.