संग्रहित छायाचित्र
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या भूसंपदानाअभावी आणि संथ गतीने चाललेल्या कामामुळे अनेक दिवसांपासून रखडले आहे. येत्या चार दिवसात जागेचे खरेदीखत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या रस्त्याचे रुदीकरण रखडल्यामुळे कात्रजकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याचे काम वेगाने केले जात असून मोबदला देण्याचे हमीपत्र देऊन जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात जागेचे खरेदीखत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने रस्त्याच्या ५० मीटर रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु त्यात आता प्रशासनाने पुन्हा बदल करून ८४ मीटर रुंदीचा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका आयुक्तांच्या दालनात सहा ते सात जागामालकांची बैठक सोमवारी (दि. १६) पार पडली. कात्रज चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. या कामामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र कात्रज-सातारा रस्त्यावरून सर्व्हीस रस्ता केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही. त्यामुळे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जागामालकांकडून जागा ताब्यात घेण्यासाठी चर्चा केली जात असून आयुक्तांच्या सहीचे हमीपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर तत्काळ जागा ताब्यात घेतली जाणार आहे.
शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक सुधारण्यासाठी कात्रज - कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. तसेच जड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे महापालिकेकडून ८४ मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी मिळाला आहे. प्रामुख्याने कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता मिळाली असून या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटी हवे आहेत. राज्य सरकारकडून १४० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या निधीचे जागामालकांना वाटप केले जाणार आहे. काही भागात काम झाले असून, ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. जेथे जागा ताब्यात आल्या तेथे रस्ता बांधला जात आहे. रस्ता तुकड्या तुकड्यात कात्रज-कोंढवा रस्त्याचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्याची रुंदी ८४ मीटर करावी अशी सूचना केली होती. त्या सूचनेनुसार महापालिकेने आता सदर रस्त्याचे ८४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.