दशहतीवर मात करून नवी झेप!
पुणे: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला (German Bakery Blast) पंधरा वर्षे होत आहेत. आतापर्यंत तिच्यावर तीनशेपेक्षा अधिक वेळ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मेटल्सचे अनेक तुकडे अजूनही शरीरात आहेत. बॉम्बस्फोटातील केमिकल्समुळे शरीर साठ ते सत्तर टक्के भाजले आहे. एक पाय गमावला आहे. अजूनही जगण्याचा संघर्ष करीत असलेल्या व जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या आम्रपाली चव्हाण अनेक आव्हानांवर मात करून सध्या‘वर्शिप अर्थ फाउंडेशन’ आणि ‘वुई पुणेकर’ या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी काम करीत आहेत. (Latest News Pune)
आम्रपाली गेली चार वर्षे पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ॲम्बॅसिडर आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशनसुद्धा करतात. मुळा-मुठा वाचविण्याचा संकल्प करून त्या शेकडो युवकांबरोबर नदीच्या स्वच्छतेसाठी लढणाऱ्या रणरागिणीदेखील आहेत.
‘‘जर्मन बेकरीत नेहमीप्रमाणे १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी सायंकाळी ६.४० वाजता मी मित्रासोबत कॉफी घ्यायला गेले होते. दुसऱ्या दिवशी व्हेलेन्टाईन डे असल्यामुळे जर्मन बेकरीत गर्दी होती. वेटर गोकुळने किचनलगत असलेल्या बेंचवर जागा करून दिली. विशेष म्हणजे, त्याच बेंचखाली बॉम्ब ठेवल्याचे नंतर मला कळले. मैत्रिणी येणार असल्यामुळे तिची वाट पाहात होते. समोर ओ हॉटेलकडे पाहात होती. मात्र मला त्या ठिकाणी कंजस्टेड वाटत होते. दरम्यान समोरची खुर्ची रिकामी झाल्याने साधारण ६.५० वाजता मी तिकडे जाऊन बसले. सायंकाळी ६.५८ च्या सुमारास कर्णकर्कश आवाज झाला. काही मिनिटे मेमरी लॉस्ट झाली होती. डोळे उघडले तेव्हा प्रचंड धूर, आगीचे लोळ डोळ्यासमोर दिसत होते. मोठ्याने रडण्याचा, ओरडण्याचा आवाज येत होता. मी काही मिनिटे अस्तित्व विसरले होते. ज्या खुर्चीवरून उठले होते त्याच जागी उडून पडले होते. अंगावर इतरांच्या शरीराचे तुकडे पडले होते,’’ अशा शब्दांत आम्रपाली यांनी जर्मन बेकरी बाॅम्बस्फोटाच्या भयंकर स्मृती ‘सीविक मिरर’कडे जागवल्या.
आम्रपाली म्हणाल्या,‘‘तब्बल ४५ मिनिटांनंतर आम्हाला मदत मिळाली होती. दोन्ही पाय भाजले होते. एका पायाचे तीन तुकडे झाले होते. पायाचे मांस आणि हाड लटकत होते. एक विदेशी व्यक्ती आगीच्या लोळात ‘हेल्प.. हेल्प...’ म्हणून याचना करीत होती. मला असह्य असल्यामुळे त्या व्यक्तीला मदत करू शकत नव्हते. तीन-चार जणांनी मला उचलून इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तब्बल ६० दिवस अतिदक्षता कक्षात माझ्यावर उपचार सुरू होते. ऐकण्याची, बघण्याची क्षमता नव्हती. शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती. दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून परत आले. या अपघातामुळे माझ्या मानसिकतेवर पूर्णपणे परिणाम झाला होता.’’
नऊ महिन्यांनंतर पहिले पाऊल घराबाहेर ठेवल्या आठवण यावेळी आम्रपाली यांनी सांगितली. ‘‘व्हिलचेअर घेणार नाही, हे मनाशी पक्के ठरविले होते. अपंग होऊन फिरणार नाही, हे ठरविले होते. त्यामुळे एल्बो स्टीक घेऊन घराबाहेर पडले. मी ‘डिफरन्ट एबल कॅटेगिरी’मध्ये मोडत होते. जॉब नव्हता. रुग्णालयात साठ दिवस अतिदक्षता कक्षात असताना पाणी पिले नव्हते. त्यामुळे पाण्याची आणि जगण्याची किंमत कळली होती. एक प्रकारची मनोविकृती आलेल्यांनीच बॉम्बस्फोट घडविला होता. या बॉम्बस्फोटामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अनेकजणांनी रक्त व प्लाझ्मा दिला होता. त्यामुळे आयुष्य दुसऱ्यांसाठी अर्थात निसर्ग आणि समाजसेवेसाठी वाहून घेण्याचा निर्धार केला आणि तो अमलातही आणला. यामध्ये ‘वर्शिप अर्थ फाउंडेशन’ तसेच ‘वुई पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष पराग मते यांनी वडिलांप्रमाणे माझी मदत केली. त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होण्यास सांगितले.’’
लहानपणी मुळा-मुठा नदीच्या काठी बालपण गेले. आता नदीचा जीव गुदमरत आहे. त्यामुळे ‘माय रिव्हर , माय व्हेलेन्टाईन’ असा मनात विचार घेऊन कार्य करीत आहे. ही संकल्पना घेऊन मुळा-मुठा नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. ११) मुळा-मुठा नदीकाठावरील पाच हजार युवकांच्या मदतीने साडेचार टन प्लास्टिक आणि कचरा ‘वर्शिप अर्थ फाउंडेशन’ तसेच ‘वुई पुणेकर’ संस्थेच्या माध्यमातून गोळा केल्याची माहिती आम्रपाली यांनी दिली.
आम्रपाली यांचे माऊंट क्लाईंबिंग अन् पॅराग्लायडिंग
आम्रपाली चव्हाण यांनी २०१५ मध्ये लेह-लडाख येथील स्टोक कांगरी या साडेसतरा हजार उंचीवर माऊंटक्लाईंबिंग केले तर २०१९ मध्ये वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने कामशेत येथे २२०० फूट उंचीवर पॅराग्लायडिंग केले आहे. कॅास्मेटिक सर्जन डाॅ. सुमित सक्सेना आणि आर्थोपेडिक डाॅ. जनार्दन पानसे हे माझ्यासाठी देवदूत ठरल्याचे आम्रपाली यांनी आवर्जून सांगितले.