संग्रहित छायाचित्र
पुण्यातील ढोल ताशा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एका ढोल ताशा पथकात (Dhol Tasha Pathak) 30 पेक्षा जास्त सदस्य असून नये या राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने आज (दि.१२) स्थगिती दिली आहे.
एका ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य असू नये असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) ऑगस्ट महिन्यात दिला होता. हा निर्णय देताना लवादाने ध्वनिप्रदूषणाचे कारण दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे पोलिसांवर बंधनकारक होते. मात्र या निर्णयाविरोधात पुण्यातील एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन (Ganeshotsav 2024) असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत ढोल ताशा प्रेमींना दिलासा दिला आहे. वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हंटले आहे. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या, कारण ढोल, ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल, ताशांचं समर्थन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrchud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
गणेश उत्सव हा एक सांस्कृतिक सण आहे. त्यामुळे एका पथकामध्ये ढोल आणि ताशा किती असावेत यावर बंधन घालणं योग्य ठरणार नाही. असा निर्णय खंडपीठाने दिला. त्यामुळे एका ढोलताशा पथकात किती सदस्य असावेत यावर बंधन असणार नाही. या निर्णयामुळे पुण्यातील ढोल ताशा प्रेमींना दिलासा मिळाला आहे.