संग्रहित छायाचित्र
राज्य सीईटी सेलच्या मार्गदर्शनाखाली सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप राऊंड) ऑनलाइन प्रवेश झाल्यानंतर रिक्त जागांवर स्पॉट प्रवेश दिले जातात. परंतु त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटके विमूक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून खुल्या प्रवर्गाइतकीच संपूर्ण फी आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमबाह्य पद्धतीने लाखो रुपयांची वसुली केली जात असून तातडीने उर्वरीत फी संबंधित विद्यार्थ्यांना द्यावी,अशी मागणी संतप्त पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एक पालक म्हणाले की, बीटेकसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली. सीईओपीकडून राखीव जागांवर स्पॉट प्रवेश दिले. त्यानंतर खुल्या प्रवर्ग, स्पॉट प्रवेशासाठी असलेली संपूर्ण फी म्हणजेच १ लाख ४२ हजार रुपये घेतली जात आहे. मुळात अन्य महाविद्यालयांमध्ये रिक्त राखीव जागांवर प्रवेश घेतला तरी आरक्षणानुसार फी घेतली जाते. या फी आकारणीसंदर्भात पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचा खुलासा सीईओपी प्रशासनाकडून केला जावा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीचे अध्यक्ष राजरत्न बलखंडे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमातींच्या राखीव जागांवर जरी प्रवेश दिला तरी फी मात्र ज्या त्या प्रवर्गासाठी निर्धारीत केलेली आहे. परंतु सीईओपीकडून खुलल्या प्रवर्गासाठी असलेली संपूर्ण फी सर्वांकडून सरसकट डिमांड ड्राफ्टद्वारे वसूल केली आहे. या संदर्भात विचारणा केली असता राज्य सीईटी सेलच्या निर्देशानुसार फी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. समितीच्या वतीने राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे. तसेच सीईओपीचे कुलगुरू डॉ.राजेंद्र भिरूड यांनाही निवेदन दिले आहे. बेकायदेशीर फी वसुलीसंदर्भात कॉलेज प्रशासनाने खुलासा करावा. तसेच सर्व राखीव जागांवरील विद्यार्थ्यांचे उर्वरीत फी परत करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थी प्रतिनिधी करिश्मा बागडे म्हणाल्या की, राज्य सरकारकडून सर्व प्रवर्गासाठी फी निर्धारीत केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही हा नियम लागू आहे. त्यामुळे सीओईपीकडून लाखो रुपयांची बेकायदेशीर वसुली केली आहे. त्याविरोधात एका आठवड्यात निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सीओईपी प्रशासनाकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. त्यामध्ये राज्य सीईटी सेलच्या निर्देशानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच खुल्या प्रवर्ग, स्पॉट प्रवेश आणि एएसएपी प्रवेशासाठी १ लाख ४२ हजार रुपये फी आकारण्यात आली आहे. जेईई, एमएच सीईटी (टेक्निकल) स्कोअर आणि बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जात आहेत, असे नमूद केले आहेत.