Pune : 'हल्दीराम'ची भोपाळची फ्रेंचयसी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पुणे : हल्दीराम कंपनीची फ्रेंचयसी देण्याच्या आमिषाने तरुणाला गंडविण्यात आले असून ५ लाख ६५ हजार रुपयांना फसविण्यात आल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयंकसिंग अरविंदकुमार सिंग (वय २९, रा. साई सृष्टी को. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, खराडी, मूळ रा. जेल रोड, भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. ते टीया या विमा कंपनीत अॅनालिस्ट या पदावर नोकरी करतात. त्यांचे आई व वडील रीटायर होणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवसाय म्हणुन ते हल्दीराम कंपनीची शाखा, भोपाळ येथे सुरु करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यांनी गुगलवर सर्च करुन हल्दीराम कंपनीबाबत एका संकेतस्थळावर भोपाळची शाखा मिळविण्यासाठी ऑनलाईन चौकशी केली. त्यांना एका मोबाईल नंबरवरुन कॉल आला. त्याने हल्दीराम कंपनी, नागपुर येथुन राकेश- सेल्स एक्झ्युक्युटीव्ह बोलत असल्याचे सांगितले. 'तुम्ही हल्दीराम कंपनीची शाखेबाबत चौकशी केली होती. तरी तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला शाखा देण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी मला व्हॉट्सअॅपव मेसेजद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेलआयडी, जीएसटी नंबर, बॅक खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो, दुकानाचे नाव इत्यादीची माहिती विचारली. नाव नोंदणीसाठी ५९ हजार रुपये भरण्यास सांगितले.
परंतु, फिर्यादी यांनी हल्दीराम कंपनीचा प्रतिनीधी पाठवा, नंतरच नोंदणी रक्कम भरतो. असे सांगितले. आरोपी राकेशने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार, अमित कुमार वर्मा नावाच्या व्यक्तीने 'तुम्हाला आधी नोंदणी रक्कम भरावी लागेल. नंतरच कंपनीचा प्रतिनीधी तुमच्याकडे येईल. असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी कागदपत्रे व आउटलेट फॉर्म भरुन ईमेलआयडीवर पाठवले. त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर नोंदणीची रक्कम भरली. राकेशने सांगितल्याप्रमाणे २ लाख ८० हजारांची सुरक्षा रक्कम, १ लाख १८ हजार ५०० रुपये करारनामा रक्कम त्यांना पाठविली. त्यानंतर आरोपींनी शाखा मिळवून देण्यासाठी ४ लाख रुपये भरण्यास सांगितले. त्याकरिता मिटींग घेण्यात येईल असे कळवण्यात आले. परंतु, मीटिंग होत नसल्याने त्यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. पैसे परत करण्यासाठी १ लाख १८ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले होते. त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिल्यांनतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ५० हजार रुपये आणि नंतर ३० हजार रुपये भरले. त्यांनी त्यानंतर आणखी २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचे फोन घेणे बंद केले. आपली ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.