लग्नानंतर मुलीला मुस्लिम धर्माप्रमाणे वागण्याची जबरदस्ती
अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशमध्ये पळवून नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर तिच्याशी लग्न करून तिला मुस्लिम धर्माप्रमाणे राहण्यास भाग लावले. हा प्रकार चार वर्षांनी समोर आला आहे. या प्रकरणातील मुलगी चार वर्षांनी मूळगावी पुण्यातील मंचर येथे आली असून त्यानंतर तीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
जावेद मुखतार शेख (वय २२, रा. मंचर एस कॉर्नर ता. आंबेगांव, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२४, ३४४, ३४ सह बा. लै. अ.प्र.का. कलम ४, ६, ८, १०, २१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मंचर येथील पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपीला समज देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याने पीडित मुलीस फुस लावून पळवून उत्तर प्रदेशात घेऊन गेला होता. त्या घटनेला आता चार वर्षाचा कालावधी लोटला आहे.
या चार वर्षाच्या काळात मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले, बीफ खाऊ घातले, तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिला नमाज करण्यास सांगितले, असे आरोप पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी केले आहेत. गेले सहा महिने आरोपी हा मंचर येथल्या घरी पीडित मुलीला घेऊन राहत होता. याबाबत २०१९ मध्ये पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीसांत तक्रार दाखल होती. मात्र, वारंवार हेलपाटे मारून देखील पोलीस गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत नव्हते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर द केरला स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी या मुलीची शोधाशोध केल्यानंतर पोलीसांनी देखील तपास सुरू केला. त्यानंतर आरोपी जावेद शेख याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मंचर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी पीडितेला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. १९ मे रोजी पीडितेला वैद्यकीय उपचारानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत नोंदवलेल्या जबाबानुसार जावेदने पीडित तरुणी अल्पवयीन असतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीसांनी जावेदला अटक केली आहे. सध्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.