Panshet road : गेल्या दोन वर्षांपासून पानशेत रस्ता खचलेलाच

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खडकवासला-पानशेत धरणाला लागून असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे असलेला हा रस्ता खचला असल्याने हा संपूर्ण परिसर अपघातप्रवण बनला आहे. सोनापूर गावाजवळ तर रस्त्याची एक बाजू अचानकच संपत असल्याने येथील वळण अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rahul Deshmukh
  • Thu, 18 May 2023
  • 11:49 am
गेल्या दोन वर्षांपासून पानशेत रस्ता खचलेलाच

गेल्या दोन वर्षांपासून पानशेत रस्ता खचलेलाच

डोणजे-सोनापूरदरम्यान पन्नास फूट अंतराचा भाग खचला; खचलेला रस्ता लक्षात न आल्याने होत आहेत सातत्याने अपघात

राहुल देशमुख

feedback@civicmirror.in

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खडकवासला-पानशेत धरणाला लागून असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे असलेला हा रस्ता खचला असल्याने हा संपूर्ण परिसर अपघातप्रवण बनला आहे. सोनापूर गावाजवळ तर रस्त्याची एक बाजू अचानकच संपत असल्याने येथील वळण अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

विशेष म्हणजे गेल्या दीड-दोन वर्षांपासून येथील रस्त्याची हीच अवस्था असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी न केल्यास हा रस्ता जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोणजे गावातून पानशेतकडे जाताना सोनापूर गावाजवळील रस्त्याचा सुमारे पन्नास फूट भाग खचला आहे. त्यामुळे आधीच निमुळता असलेला रस्ता आता आणखी निमुळता झाला आहे. दोन वाहने एकाचवेळी विरुद्ध दिशेने आल्यास रस्ता पार करताना अडचण येते. या रस्त्याची फारशी माहिती नसलेल्यांसाठी हा भाग अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो. यापूर्वी या परिसरात गाडी रस्त्यावरून खाली उतरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खचलेला रस्ता लक्षात न आल्यानेही सातत्याने अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याची तक्रार स्थानिकांनी 'सीविक मिरर'शी बोलताना केली आहे.  

स्थानिक नागरिक संदीप गोरड म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांपासून रस्त्याची हीच स्थिती आहे. तात्पुरता भराव टाकला जातो. मात्र, पुन्हा तशीच अवस्था होते. इथे कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची गरज आहे.  खडकवासला, पानशेत आणि वरसगाव परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. पानशेत आणि वरसगावमधील हिरवे डोंगर पर्यटकांना खुणावत असतात. दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथील रस्त्यांवर विकेंडला नेहमीच गर्दी असते. माताळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत सात मुली खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडाल्या. त्यातील पाच जणींना स्थानिक शेतकऱ्यांनी वाचवले. तर, दोन जणींचा मृत्यू झाला. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात धरणाच्या पाण्यात उतरू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने आवाहन केले आहे. तसेच, फलकांच्या माध्यमातून धोक्याचा इशाराही दिला आहे.

माताळवाडी येथे नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांना पाण्यापासून असलेला धोका दर्शवणारे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे, धोक्याची वळणे अथवा खचलेला रस्ता असा धोक्यांचा इशारा देणारे फलक इथे क्वचितच दिसतात. सोनापूरजवळील खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा. रस्ता दुरुस्त होईपर्यंत खचलेल्या भागापूर्वी काही मीटर अंतरावर दोन्ही बाजूंनी इशारा देणारे फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

रस्त्याबाबत तातडीने उपाययोजना न आखल्यास खडकवासल्याचे पाणीच नव्हे तर परिसरातून जाणारा रस्ताही धोक्याचा ठरू शकतो. पुढील महिन्यापासून पाऊस सुरू होईल. या भागात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे या रस्त्यावर असणारे खड्डे आणखी मोठे होण्याची शक्यता आहे. खचलेल्या रस्त्याची आणखी दुर्दशा होणार आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करावी आणि आवश्यक तिथे रस्ता खोदून शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुती करण्यात यावी,  अशीही मागणी केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest