संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हवेली तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. नोटीस देऊनही अनुपालन न झाल्याने पीएमआरडीएकडून आता धडक कारवाई होत असून सोमवारी (दि. ७) संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले. या पूर्वी हिंजवडी आणि हडपसर या ठिकाणी दाखल केले आहेत.
लोणीकंद (ता. हवेली येथील) येथील स.नं. १६७ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे किशोर सूर्यकांत ढमढरे, लक्ष्मण श्रीपती ढमढरे, रफिक इक्बाल शेख, सागर दामोदर धोत्रे, अनिता संजय जोशी ( सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) यांचे विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएने वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस िदली होती. पण याचे अनुपालन न केल्याने संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५४ (२) अन्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. पीएमआरडीए हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करत सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार सचिन मस्के, रवींद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी केली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ नुसार अनधिकृत बांधकामधारकास अनधिकृत बांधकाम थांबवण्याची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबवल्यास तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.