प्राण्यांना खायला घालणे हा घटनात्मक अधिकार

भटकी कुत्री, मांजरांना खायला घालण्यावरून वादाचे प्रसंग घडतात. मात्र, पशू-पक्ष्यांना खायला घालणे हा घटनात्मक अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (ए) जी नुसार कोणत्याही प्राणीप्रेमीला

प्राण्यांना खायला घालणे हा घटनात्मक अधिकार

विरोध करणाऱ्यांवर होऊ शकतो गुन्हा दाखल, महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांनी केले स्पष्ट

भटकी कुत्री, मांजरांना खायला घालण्यावरून वादाचे प्रसंग घडतात. मात्र, पशू-पक्ष्यांना खायला घालणे हा घटनात्मक अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (ए) जी नुसार कोणत्याही प्राणीप्रेमीला पशू-पक्ष्यांना खाद्य देण्यापासून रोखता येणार नाही, असे आदेश ॲनिमल वेल्फअर बोर्डने दिले असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.

रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) खायला घालणाऱ्यांना अनेकदा विरोध केला जातो. हडपसर (Hadapsar) परिसरात तर एका महिलेला यावरून मारहाणही झाली होती. मात्र, प्राणी आणि पक्ष्यांना खायला घालणे हा प्राणीप्रेमींचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही प्राणीप्रेमीला प्राणी आणि पक्ष्यांना खायला देण्यापासून थांबवणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक त्रास देणे किंवा शारीरिक इजा करणे कायद्याने गुन्हा आहे. याची जनजागृती करण्याचे आदेश ॲनिमल वेल्फअर बोर्डने दिल्याचे डाॅ.  पवार यांनी ‘सीविक मिरर’ला  सांगितले.

ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने (Animal Welfare Board of India) देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषतः महापालिकांना भटक्या कुत्र्यांच्या आणि मांजरांची काळजी तसेच देखभालीसाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. यानुसार प्राण्याला दगड मारणे, लाथ किंवा काठीने मारहाण करणे, प्राण्याला त्याच्या ठिकाणाहून हाकलून लावणे  प्राणी  क्रुरता अधिनियमाअंतर्गत गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता ४२९ नुसार प्राण्यांवरील क्रुरता हा दंडनीय गुन्हा आहे. यामध्ये दंडासह शिक्षा पाच वर्षापर्यंत वाढू शकते, असे फलक पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याबाहेर लावण्यात असल्याचे पवार यांनी सांगितले.

कोविडकाळात उपासमारीने लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

पुणे शहरात २०१८ मध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ३ लाख १५ हजार होती. कोविडकाळात भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊन अनेकांचा  मृत्यू झाला. नव्याने पुणे शहरातील कुत्र्यांची गणना केल्यानंतर ती १ लाख ७९ हजारावर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या ९० हजार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तीन टक्के भटक्या कुत्र्याची संख्या असावी, असा नियम ॲनिमल वेल्फेर बोर्ड ॲाफ इंडियाचा असल्याचे पिंपरी(चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे पशूवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरूण दगडे यांनी सांगितले. 

 समाविष्ट गावांमधील भटक्या कुत्र्यांची होणार गणना

 पुणे महापालिकेच्या २०२४ -२०२५ च्या अर्थसंकल्पात रेबिजमूक्त पुणे करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर मांजरींवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. यासह ३४ समाविष्ट गावातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात येणार आहे. पुणे शहरात सध्या एक लाख ७९ हजार भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. ही संख्या तीन लाखाच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे पुणे महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी डाॅ. सारिका फुंडे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest