राज्यातील ‘त्या’ चार भ्रष्टाचारी आमदारांना देऊ नका मंत्रिपद

राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले आहे. मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार तत्काळ होईल, असे सांगितले जात होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Dec 2024
  • 04:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विद्यार्थी संघटनांची आक्रमक मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले आहे. मोठ्या दिमाखात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार तत्काळ होईल, असे सांगितले जात होते. परंतु मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा रंगली असताना भ्रष्टाचार आणि इतर गंभीर आरोप असलेल्या राज्यातील चार आमदारांना मंत्रिपद देण्यात येऊ नये, अशी मागणी करत पुण्यातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आपल्या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारी (दि. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रिपदे देऊ नका, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या आमदारांवर भ्रष्टाचार आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आमदारांना मंत्रिपद दिल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, अशा इशारा दिला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार येऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला. या सरकारमध्येपण इतर खात्याची मंत्रिपदे केव्हा जाहीर होतात आणि या महायुती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना विद्यार्थी संघटनांच्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच यावेळी आरोपी आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

यावेळी मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनीदेखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तसेच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तर समाजात तेढ निर्माण करणारी विधाने भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करत आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी संघटनांनी दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest