घरगुती गॅस पुरवठा
पुणे शहरातील अनेक भागांचा एमएनजीएल लाईन मार्फत होणारा घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. आज सकाळी उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे नागरिकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारींचा पाऊस पाडला आहे. मात्र, एमएनजीएलकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
काल रात्रीपासून वानोरी आणि आजूबाजूच्या परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा खंडीत झाला. तर आज सकाळी उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील गॅस पुरवठा खंडीत झाला. गॅस पुरवठा खंडीत झाल्यानंतर एमएनजीएलकडून नेहमी नागरिकांना सुचना केल्या जाते. मात्र, यावेळी तक्रारी करूनही एमएनजीएलकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी रहिवाशांनी ट्वीटद्वारे केल्या आहेत.
मोहम्मद वाडी येथील न्याती एक्सोटिका कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशाने ट्विट केले की, “न्याती एक्झोटिकाचा गेल्या नऊ तासांपासून एमएनजीएल गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. तर उंड्री येथील अनेक रहिवाशांनीही त्यांच्या परिसरात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचे ट्वीट केले आहे. या विस्कळीत एमएनजीएलकडून कोणताही अधिकृत संवाद झाला नसून पुरवठा कधी पूर्ववत होईल याबाबतही माहिती देण्यात आली नाही, असेही ट्वीटव्दारे रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत.