पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे पाच वर्षांपासून श्वानपथकाचा अभाव
पिंपरी चिंचवड पोलिसांकडे स्वत:चे श्वान पथक, बॉम्ब शोधक- नाशक पथक नसल्याने यासंबंधीच्या कामांसाठी त्यांना पुणे पोलिसांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. मागील पाच वर्षांपासूनची ही अवस्था आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांकडे त्यांच्या श्वान पथकातील दोन श्वान देण्याची मागणी केली आहे. याबाबतचा पत्रव्यवहारही मागील महिन्यात करण्यात आला होता. मात्र, पुणे पोलिसांनी सुरुवातीला त्याला नकार दिला होता. आता पुन्हा पिंपरी पोलिसांनी याबाबतची मागणी केली आहे. त्यामुळे पिंपरी -चिंचवड पोलिसांची कोणी 'श्वान देता का श्वान' अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मागणीबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार सकारात्मक आहेत. मात्र, श्वान मिळून ते कामाला लागेपर्यंत 'श्वान देता का श्वान' ही स्थिती कायम राहणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. आतापर्यंत आर. के. पद्मनाभन, संदीप बिश्नोई , कृष्ण प्रकाश, अंकुश शिंदे हे चार पोलीस आयुक्त होऊन गेले. विनय कुमार चौबे हे पाचवे पोलीस आयुक्त सध्या कार्यरत आहेत. विविध आस्थापना या आयुक्तालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही आयुक्तालयात श्वान पथक तयार करण्यात आलेले नाही. यासोबतच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही तयार केलेले नाही. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने तसेच बॉम्ब तपासणीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण केले जाते. यामुळे पुण्याच्या श्वान पथकावरील कामाचा ताण वाढला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत तब्बल ३३ पोलीस ठाणी आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखात्यारीत १४ पोलीस ठाणी आहेत. अशा एकूण ४७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, घरफोड्या आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पुण्याच्या श्वान पथकाला बोलावले जाते. तसेच, संशयास्पद किंवा बॉम्ब सदृश वस्तुंची तपासणी करण्याकरिता श्वान पथक आणि बॉम्ब शोधक- नाशक पथकाला पाचारण केले जाते. आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार पुणे पोलिसांचे श्वान पथक ग्रामीण पोलिसांच्याही मदतीला जाते. त्यामुळे या पथकांवर कामाचा वाढता तणाव आहे. प्रसंगी या पथकांना चाकण पासून देहूरोड पर्यन्त जावे लागते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द देखील वाढत चालली आहे. सोबत लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारी आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांना श्वान पथकाची आवश्यकता भासणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांकडे दोन श्वान त्यांच्या पथकाच्या उभारणीसाठी मागितले आहेत. हे श्वान आणि त्यांचे हँडलर मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. याबाबत सविस्तर पत्र त्यांनी पुणे पोलिसांना ऑगस्ट महिन्यात पाठविले होते. त्यावर पुणे पोलिसांनी श्वान देण्याबाबत वेळकाढू भूमिका घेतली होती. पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडे चार श्वान आहेत. गुन्हे शाखेच्या आस्थापनेवर सध्या एकूण आठ श्वान आहेत. यातील पाच श्वान वृद्ध झालेले असून त्यांची सेवा लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रभावी काम करण्यासाठीचे तीनच श्वान पुणे पोलिसांकडे आहेत. यातील दोन श्वान दिल्यानंतर आपण करायचे काय असा प्रश्न पुणे पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचीही अडचण झाली आहे.
पुणे पोलीस दोन श्वान देणार आहेत. त्यातील एक मालमत्ता गुन्ह्यांच्या तपासात मदत करेल तर दुसरा बॉम्ब शोध कामासाठी मदत करेल. या श्वानांना ठेवण्यासाठी आवश्यक खोल्या बांधण्याचे काम सुरू असून दोन-तीन दिवसात हे काम पूर्ण होईल.
- विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांकडे श्वान पथकासाठी श्वान देण्याबाबत मागणी केलेली होती. याबाबत त्यांचे पत्रही मिळालेले होते. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. आमच्या आस्थापनेवरील श्वान त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.