पदपथासाठी कोणी बजेट देतं का बजेट?
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबू नये, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विविध उपाययोजना राबवण्याचा आव आणणाऱ्या पुणे महापालिकेने मात्र कोथरूडकरांना मात्र पदपथाचे काम करण्यासाठी बजेट नसल्याचे उत्तर दिले आहे. पावसाळ्यापूर्वी पदपथाचे काम पूर्ण करा अशी विनंती करणाऱ्या नागरिकांना पुणे महापालिका आयुक्तांनी बजेट आल्यानंतर काम केले जाईल, असे उत्तर देऊन वाटेला लावले आहे. त्यावर आता पावसाळ्यात पदपथावरील चिखल तुडवत चालायचे का? असा सवाल कोथरूडकर उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी केबल टाकण्यासाठी उखडलेला पदपथ अजून दुरुस्त करण्यात आलेला नाही.
मेट्रोच्या कामामुळे पौड रस्त्यावर अनेकदा खोदकाम करण्यात आले आहे. येथील मेट्रोचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यानंतर अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पौड रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. चांदणी चौकामार्गे मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. तसेच, उपनगरात चाललेल्या कामांसाठीची जडवाहतूकही याच मार्गावरून होते. या परिसरातील मोठा कचरा डेपोही याच रस्त्यावर आहे. त्यामुळे इथे वाहनांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत असते. परिणामी पदपथ हाच पादचाऱ्यांसाठी एकमेव मार्ग आहे. रहदारीमुळे पदपथ सोडून रस्त्यावर चालणे धोकादायक ठरते.
वनाज मेट्रो स्टेशनजवळ सह्याद्री हॉस्पिटलच्या परिसरातील पदपथ पूर्णतः उखडले गेले आहे. पादचाऱ्यांना कसरत करत चालावे लागते. पाऊस पडल्यास चिखलातून मार्गक्रमण करीत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. किमान दोन पावसाळे झाले तरी, इथे अशीच स्थिती आहे. त्यानंतरही एकाही अधिकाऱ्याने दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही. इतकेच काय, तर तक्रार केल्यानंतरही बजेट नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वनाज येथील स्काय स्पोर्टचे मालक गौरव प्रयाग म्हणाले, 'मेट्रोच्या कामासाठी केबल लाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी किमान दोन वर्षांपूर्वी खोदाई करण्यात आली होती, तेव्हापासून पदपथाची दुरवस्था झाली आहे. थोडासा पाऊस पडला, तरी इथे चिखल होतो. गवत वाढते. त्यावरून चालणेही अवघड होते. चिखल आणि वाढलेले गवत अशी स्थिती दिसल्यास काही आगंतुक कचराही टाकूनही जातात. त्यामुळे येथील दुकानदारांना व्यवसाय करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पादचाऱ्यांची होणारी तारांबळ आणखी वेगळी आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथे दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे.'
स्थानिक रहिवासी अमोल काळे म्हणाले, 'येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर मे महिन्याच्या सुरूवातीस महानगरपालिकेला पदपथाबाबत ऑनलाईन तक्रार केली. नागरिकांना चालणे अवघड होत आहे. पावसाळा आल्यानंतर त्यांच्या त्रासात आणखी भर पडेल म्हणून येथील पदपथाची दुरुस्ती करावी अथवा नवीन पदपथ करावा अशी मागणी केली होती. पदपथाचे काम दीर्घकालीन श्रेणीत मोडते. या कामासाठी अद्याप बजेट उपलब्ध झालेले नाही. या कामासाठी बजेट उपलब्ध झाल्यानंतर पदपथाबरोबरच सायकल ट्रॅकचे काम पूर्ण केले जाईल, असे उत्तर कोथरूड बावधनमधील कनिष्ठ अभियंता प्रियांका बांटे यांनी दिले आहे.'
महापालिकेचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू झाले आहे. कामाचे नियोजनही त्याप्रमाणेच केले जाते. जो पदपथ किमान दोन वर्षे उखडलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी वाट पाहायला लावली जाते. बजेट उपलब्ध झाल्यावर काम केले जाईल, असे उत्तर दिले जाते. हा प्रकार अनाकलनीय आहे.