‘धायरी’करांचा रस्त्यासाठी धावा; थेट मुंबईत आझाद मैदानावर उपोषण
पुणे : पुण्याच्या उपनगरांपैकी झपाट्याने विस्तारत असलेल्या धायरी परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परंतु, या भागातील रस्त्यांची अवस्था मात्र अद्याप बिकट असून अनेक रस्ते कामाअभावी रखडले आहेत. यासोबतच धायरी परिसरातील डी. पी. रस्ते देखील रखडलेले असल्याने वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. अपघात तर दैनंदिन स्वरूपात घडत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या धायरीकरांनी २८ वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे लक्ष वेधन्यासाठी मुंबईतील आजाद मैदानावर लाक्षणिक उपोषण केले. प्रशासनाने धायरी गावात २८ वर्षांपूर्वी ४ डीपी रस्त्यांचे नियोजन केले होते. मात्र, याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यात आलेले असल्याचे काम सुरू होण्यात अडचणी येत आहेत.
आजवर या भागाच्या नियोजनाच्या नावाखाली कररूपी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. या भागातील डी पी रस्ते कागदावरच राहिले आहेत. धायरी गावासह मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या आक्राळविक्राळ बनली आहे. दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असतानाही त्या तुलनेत रस्त्यांचा विकास मात्र होताना दिसत नाही. सध्याचे रस्ते अपुरे पडत आहेत. रोजच्या वाहतूक कोंडीने धायरीकरांसह परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. प्रशासनाने सिंहगड रोड ते धायरीमधील सावित्री गार्डन पर्यंतच्या डी पी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ नियोजन आणि निविदा यातच खर्च केला आहे. विकास आराखड्यात नमूद असलेल्या धायरी येथील सावित्री गार्डन ते सिंहगड रोड या रस्त्यावर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. या रस्त्याचे जेमतेम ४०० मीटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.
धायरी फाटा ते धायरी गाव रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यन्त रांगा लागतात. शालेय विद्यार्थ्यांसह रुग्ण, चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकून पडतात. याभागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच पर्यायी रस्त्याची कामे तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी धायरी ग्रामस्थांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, नागरिकांच्या पदरी केवळ निराशा पडली.
यासोबतच या भागातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच, त्यांच्या मदतीला होमगार्ड, वाहतूक वॉर्डन देखील देण्यात येत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. तसेच, सिग्नल व्यवस्था बंद असल्याने वाहतूक कोलमडल्याचे दिसत आहे. धायरी गाव रस्त्यासह धायरी- नऱ्हे, नांदेड फाट्या पासून नांदेड सिटी गेट, लगड मळा ते धायरी फाट्यापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.