तुला घरी बसविन...उप वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला महिला सुरक्षा रक्षकाकडून धमकी

महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील महिला उपवैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षा रक्षक महिलेमध्ये वाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वादातून एका सुरक्षा रक्षक महिनेने राजकीय कार्यकर्त्यांना बोलावून अधिकारी महिलेला घरी बसविण्याचीच धमकी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 8 Sep 2023
  • 01:50 pm
Deputy Medical Officer threat

उप वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला महिला सुरक्षा रक्षकाकडून धमकी

पुणे: महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील महिला उपवैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षा रक्षक महिलेमध्ये वाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वादातून एका सुरक्षा रक्षक महिनेने राजकीय कार्यकर्त्यांना बोलावून अधिकारी महिलेला घरी बसविण्याचीच धमकी दिली आहे. या प्रकारामुळे पालिकने या रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र बदली मान्य नसल्याने अनेकजण कामावर रुजू झाले नाहीत. उलट राजकीय व्यक्तींकडे जावून बदल्या रोखण्याचे प्रकार सुरु असल्याने रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये नागरिकांना त्रास होऊ नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. मात्र महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थाच कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. एका महिला सुरक्षा रक्षकानेच वर्ग एक च्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला धमकाविल्याचा प्रकार घडला आहे. ज्यांच्या जीवावर सुरक्षा सोपवली आहे, त्यांनीच बाहेरील राजकीय कार्यकर्त्यांना बोलावून महिला अधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रकार घडला. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यावर असे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण झाली आहे. तसेच बदल्या झाल्याने प्रामाणिपणे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. महापालिकेने संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यापेक्षा थेट सर्वच सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र या निर्णयावर कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका दोघांनी चुक केली म्हणून इतरांना त्याची शिक्षा का? असा प्रश्न येथील कामगारांनी उपस्थित केला आहे. यामध्ये कोणतीही चुक नसताना बदली होत असल्याने नुकसान होणार असल्याचे कामगार बोलत आहेत. काही महिला सुरक्षा रक्षकांचा गट आहे, की जो प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील जुमानत नाही. त्यांची गेल्या दहा वर्षात कुठेही बदली झाली नाही. मात्र  एकाच्या चुकीमुळे इतरांना शिक्षा करणे योग्य नाही, त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट सर्वांच्या बदल्या न करता संबंधितांवर कारवाई करावी. अशी मागणी कामगारांनी सीवीक मिररशी बोलताना केली. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बदली रद्द करावी...

 सोनवणे रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापूर्वीच बदली झाली होती. आता पुन्हा दुसरीकडे बदली करण्यात आली आहे.  बदली होऊन माझे नुकसान होणार आहे. एक तर आम्ही कंत्राटी कामगार असल्याने दोन ते तीन महिने पगार होत नाहीत. त्यामुळे घर कसे चालवावे असा प्रश्न पडतो. कुंटूबात मी आणि माझी सासू दोघीच आहोत. सासूबाई आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कमला नेहरु रुग्णालयात तीन शिफ्ट आहेत. नाईट शिफ्ट करावीच लागते. त्यामुळे मला ते अडचणीचे ठरणार आहे. प्रशासनाने आमच्या या बाजूचा पण विचार करुन अन्याय न करता बदली करु नये.

नेमके काय आहे प्रकरण...

 एका सुरक्षा रक्षक महिलेची मुलगी नर्सिंग वाॅर्ड मध्ये काम करते. तिला अनुभव नसल्याने काम करताना अडचणी येतात. त्यामुळे तिच्याकडून अनेकवेळा चुका होतात. त्यामुळे एका वरिष्ठ वैद्यकीय महिला अधिकाऱ्याने काम करता येत नसेल तर दुसऱ्या वार्डात काम कर, अशा शब्दात रागावले. या प्रकारामुळे त्या सेविकेच्या आईने म्हणजेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने बाहेरील राजकीय तीन कार्यकर्त्यांना बोलवून महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. व्हिडिओ शुटींग सुरु केली. एकाच दिवसात घरी बसवू. अशी धमकी दिली. यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत लेखी तक्रार केली आहे.

रुग्णालयातील सुरक्षा वाऱ्यावर, २० दिवसात घडला तिसरा प्रकार...

 कमला नेहरू रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर गेली आहे. मागच्या २० दिवसात महिला कर्माचऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अंगावर जाणे असे प्रकार घडत आहेत. एका डॉक्टर महिलेचा हात धरण्याचा प्रकार नुकताच घडला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका नर्सच्या (परिचारिका) अंगावर जात पुरुषाने शिवागाळ केल्याचा प्रकार देखील घडला होता. हे दोन प्रकार ताजे असतानाच आता तिसरा प्रकार घडला आहे. यामुळे महापालिका आता तरी सुरक्षेच्या बाबतीत गंभीर होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणारी आरेरावी सहन केली जाणार नाही. जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. कामगारांच्या वेळीच बदल्या करणे आवश्यक आहे. नाही तर त्यांची एकाधिकारशाही तयार होते. सर्वच सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  - माधव जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest