पुणे : पगार मागितल्याने ठरविले मनोरूग्ण?
पश्चिम बंगालमधून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या मध्यमवयीन पुरुषाने सहा महिने हाॅटेलमध्ये कूकचे काम केल्यानंतर पगार मागितल्यामुळे हाॅटेल मालकाने त्याला मनोरुग्ण ठरवून येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवल्याचा दावा करण्यात येत आहे.
दिलीप बिस्वास (वय ४३ रा. नादिया, पश्चिम बंगाल) असे या प्रकरणातील पीडित पुरुषाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालमधून नोकरीसाठी पुण्यात आला होता. पुण्यात सेटल होऊन आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने निगडी येथील एका हॉटेलमध्ये कूकची नोकरी पत्करली. मात्र, सहा महिने झाले तरी हॉटेल मालक पगार देत नसल्यामुळे दिलीप संयम सुटला. त्याने मद्यमान करून पगारासाठी मालकासोबत भांडण केले. याचा राग आल्याने मालकाने चक्क पोलिसांशी संगनमत करून दिलीपला मनोरुग्ण ठरवले. हाॅटेलमालक इथेच थांबला नाही.
त्याने पोलिसांमार्फत दिलीपची रवानगी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात केली. मात्र, येथील एका समाजसेवा अधीक्षकाच्या सजगतेमुळे तो मनोरूग्ण नसल्याचे लक्षात आले. या समाजसेवा अधीक्षकाने दिलीपच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला साडेतीन महिन्यानंतर त्याच्या मूळगावी परत पाठवून दिले.
निगडी पोलिसांनी १९ एप्रिलला एक मध्यमवयीन पुरुषाला येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल केले होते. समाजसेवा अधीक्षक मारुती दुणगे यांनी तरुणाबरोबर चर्चा केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. दिलीपला उत्तम स्वयंपाक करता येत असल्यामुळे त्याला निगडी येथील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून नोकरी मिळाली. सहा महिने झाले तरी हॉटेलमालकाने त्याला पगार दिला नाही. वारंवार आर्जव-विनंती करूनही पगार मिळत नसल्याने बिस्वासचा संयम सुटला आणि त्याने मद्यपान करून मालकासोबत याच विषयावरून भांडण केले.
यामुळे चिडलेल्या हॉटेलमालकाने निगडी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संगनमताने बिस्वासला मनोरूग्ण ठरविण्याचा प्लान आखला. त्याला मद्याच्या अमलाखाली येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरूग्णालयातील नियमाप्रमाणे दिलीपला १५ दिवस निरीक्षणगृहात ठेवले. तेथे त्याच्यामध्ये मनोरूग्णाची कोणतीच लक्षणे नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील, वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी आणि डॉ. अमित गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपला समाजसेवा अधीक्षक मारुती दुणगे यांच्याकडे सोपवण्यात आले.
दुणगे यांनी दिलीपशी संवाद साधून त्याला बोलते केले आणि त्याच्याकडून मूळगाव तसेच भावाचा मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती घेतली. आपण नोकरीसाठी पुण्यात आल्याचे त्याने सांगितले. हॉटेलमालकाने पगार तर दिलाच नाही, पण पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे दिलीपने सांगितले.
दुणगे यांनी दिलीपचा भाऊ अर्जुनसोबत मोबाईलवर संपर्क साधला. त्याला सर्व हकीकत सांगितली. भावासोबत घडलेला भायनक प्रकार कळताच अर्जुनने येरवडा मनोरूग्णालय गाठले. गेली तीन ते साडेतीन महिने भावाचा काहीच संपर्क नसल्यामुळे कुटुंबीय काळजीत असल्याचे अर्जुनने रुग्णालय प्रशासनाला सांगितले. रुग्णालयातील सर्व सोपस्कार पार करून अर्जुन आपल्या भावाला घेऊन शुक्रवारी (दि. २) दुपारी पश्चिम बंगालकडे रवाना झाला.
निगडी पोलिसांनी आरोप फेटाळले
दिलीप विश्वास हा मनोरुग्ण नसतानाही त्याला मनोरुग्णालयात पाठवण्यात आल्याचे आरोप निगडी पोलिसांनी साफ शब्दांत फेटाळून लावले. ‘‘संबंधित व्यक्ती नग्नावस्थेत रस्त्यावर फिरून महिलांना त्रास देत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यावरून घटनास्थळी जाऊन त्याला नग्नावस्थेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तो काम करीत असलेल्या हॉटेलच्या चालकाकडून संपर्क क्रमांक घेऊन आम्ही त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यावेळी तो वेडसर वागत असल्याने त्याच्यावर मूळ राज्यात उपचार सुरू असल्याचे पत्र आणि उपचार सुरू असलेली कागदपत्रे नातेवाईकांनीच पाठवली होती. त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाच्या आदेशानेच आम्ही त्याला येरवडा येथे दाखल केले. दिलीपचे कुटुंबीय येथे आल्यावर त्याचा ताबा त्यांना द्यायला हरकत नाही, असेदेखील येरवडा रुग्णालयाला कळविले होते. संबंधित व्यक्तीला सोडण्यास येरवडा मनोरुग्णालयाने एवढा वेळ का घेतला, याची आम्हाला कल्पना नाही,’’ असे निगडी पोलीस ठाण्याशी संबधित अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला सांगितले.
मनोरूग्णालयात एखाद्या रुग्णाला दाखल करण्यापूर्वी त्याच्या पूर्वीच्या आजाराची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याची वागणूक कशी आहे. तो हिंसक झाला आहे का, त्याच्या बोलण्यात-वर्तनात डिसऑर्डर (असंबद्धता) आहे का, हे पाहिले पाहिजे. त्याच्या वर्तनाची खातरजमा केली पाहिजे. अन्यथा केवळ व्यसन आहे, म्हणून मनोरूग्णालयात दाखल करणे चुकीचे आहे. अशाने कोणीही उठेल आणि एखाद्याला मनोरूग्णालयात दाखल करेल. ही बाब गंभीर आहे.
- डॉ. विलास भैलूमे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ
निगडी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने अज्ञात व्यक्तीला येरवडा मनोरूग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. यावेळी दिलीप बिस्वास याचे आधारकर्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रे जोडली होती. त्या कागदपत्रांच्या आधारे दिलीपशी संवाद साधून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. दिलीपचे वर्तन पाहता प्रथमदर्शनी तो वेडा असल्याचे जाणवले नाही.
- मारुती दुणगे, समाजसेवा अधिक्षक, येरवडा मनोरुग्णालय